संचारबंदीमुळे कामाचे तास आणि ताणही वाढला: महिला पोलिसांचीही होतेय कुचंबना
By जितेंद्र कालेकर | Published: March 26, 2020 10:54 PM2020-03-26T22:54:52+5:302020-03-26T23:01:13+5:30
राज्यातील संचारबंदीमुळे ठाणे शहर पोलिसांवरही कमालीचा ताण वाढला आहे. सकाळी ६ ते रात्री १० अशी तब्बल १५ ते १६ तासांची डयूटी झाल्यामुळे त्यांचेही मोठया प्रमाणात हाल होत आहेत. त्यातही महिला पोलिसांना तर अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील संचारबंदीमुळे ठाणे शहर पोलिसांवरही कमालीचा ताण वाढला आहे. सकाळी ६ ते रात्री १० अशी तब्बल १५ ते १६ तासांची डयूटी झाल्यामुळे त्यांचेही मोठया प्रमाणात हाल होत आहेत. त्यातही महिला पोलिसांना तर अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आल्याची माहिती अनेक कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातच २४ मार्च रोजी रात्रीच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. महाराष्टÑात ती आधीपासूनच म्हणजे २३ मार्चपासून लागू केलेली आहे. या काळात नागरिकांनी बाहेर पडू नये, असे वारंवार पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ठाणे शहरातील अनेक नाक्यांवर आणि मुख्य रस्त्यांवर पोलीस तैनात केले आहेत. या सर्व ठिकाणी नागरिकांनी तोंडाला मास्क लावले की नाही? तसेच ते कोणत्या कामासाठी बाहेर पडले? त्याची कारणे पोलिसांकडून जाणून घेतली जात आहेत. जिथे अनावश्यक फिरणारी मंडळी दिसतील त्यांना सहज सोप्या भाषेत ‘समज’ही दिली जात आहेत. गर्दी करणाऱ्यांविरुद्ध कलम १०२ नुसार कारवाई केली जात आहे. तर काही ठिकाणी सौम्य लाठीमारही पोलिसांना करावा लागत आहे. हे सर्व करतांना प्रत्येक पोलीस ठाण्याचा संपूर्ण म्हणजे साधारण १०० ते १५० जणांचा कर्मचारी आणि अधिकारी वर्ग हा चौका चौकात तैनात आहे. अनेकांना सकाळी ७ ते रात्री १० वाजताची डयूटी आहे. एरव्ही, हीच डयूटी सकाळी ९ ते रात्री ९ आणि रात्री ९ ते सकाळी ९ अशी असते. अनेकदा सकाळी ९ पर्यंतची डयूटी पुढे लांबण्याची शक्यता असते. त्यामुळे सलग १५ ते १६ तास कामावर राहून प्रचंड ताण वाढत असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाने सांगितले. तर वागळे परिमंडळातील एका ५७ वर्षीय हवालदाराला पालघर येथून रस्त्यावर मिळेल त्या वाहनाने रोज ठाणे गाठावे लागते. त्यात रेल्वे आणि एसटी सेवाहीबंद असल्यामुळे ठाण्यात येईपर्यंत चांगलीच दमछाक होत असल्याचे त्यांनी सांगितले. अशीच परिस्थिती स्वत:चे वाहन नसलेल्या पोलिसांचीही झाली आहे. त्यांना अगदी ठाण्यातल्या ठाण्यात किंवा ठाण्यातून मुंबईत अथवा नवी मुंबई, बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी येथून ठाण्यात किंवा ठाण्यातून इतरत्र जाण्यासाठी मोठी समस्या उद्भवली आहे. काहींनी ठाण्यातील आपल्या मित्रांकडे काहींनी पोलीस ठाण्यातच तर काहींनी एखादे हॉटेल गाठले आहे. सध्या, प्रत्येक पोलीस ठाण्याचे तपासणी नाकेही वाढविले आहेत. हे तपासतांना अनेक नागरिकांशीही पोलिसांचे खटके उडत आहेत. हॉटेल आणि पोळी भाजी केंद्रही बंद असल्यामुळे वेळेवर जेवणही उपलब्ध होत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.
* संचारबंदीचा फटका महिला पोलीस कर्मचा-यांनाही बसला. डयूटीचे तास वाढल्यामुळे त्यांना नेहमीपेक्षा जास्त कालावधी कुटूंबापासून दूर रहावे लागत आहे. यात चांगलीच ओढाताण होत असल्याचे अनेक महिला कर्मचाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले. अनेकींना तर पोलीस ठाण्यातच आसरा घ्यावा लागल्याचे सांगितले. अशीच परिस्थिती उपनिरीक्षक आणि त्यावरील अधिकाºयांची आहे. किंमान कामाचे तास नेहमी इतकेच ठेवावेत, इतकी माफक अपेक्षा पोलीस कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे.