एकमेकांसोबत समन्वय साधून काम करा; महायुती पदाधिकारी मेळाव्यात नेते मंडळींचा सल्ला
By अजित मांडके | Published: August 14, 2024 06:17 PM2024-08-14T18:17:03+5:302024-08-14T18:17:48+5:30
ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून पालघर नवीमुंबई अशी ही यात्रा असणार आहे.
ठाणे - विधानसभा निवडणुकीला सामोरे जातांना यातील जे प्रमुख नेते आहेत, त्यांचे तोंडे विरुध्द दिशेला असू नयेत, त्यांची तोंड एकमेकांसमोर असायला हवीत असा सल्ला माजी खासदार कपील पाटील यांनी शनिवारी महायुतीच्या झालेल्या बैठकीत दिला. तसेच जो काही फेक नरेटीव्ह सेट केला जात आहे, तो सोशल मिडियाच्या माध्यमातून खोडून काढा असे आवाहन प्रसाद लाड यांनी यावेळी केले. तसेच लोकसभा निवडणुकीत जे झाले ते आता न करता एकमेकांसमोबत समन्वय साधून काम करा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
ठाण्यात टिप टॉप येथे बुधवारी सकाळी महायुतीचा समन्वयक मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक तसेच कोकणचे विभागाचे समन्वयक उद्योगमंत्री उदय सामंत, प्रसाद लाड, आमदार गणेश नाईक, अनिकेत तटकरे, खासदार नरेश म्हस्के, डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार कपिल पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या माध्यमातून येत्या २४ ऑगस्ट पासून प्रचार यात्रेला सुरवात होणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली.
ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून पालघर नवीमुंबई अशी ही यात्रा असणार आहे. एकजूट महाराष्टासाठी अभियान विकासासाठी कल्याणासाठी हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सोशल मिडिया आर्मी तयार करुन त्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून जो काही फेक नरेटीव्ह सेट केला जात आहे. त्याला या आर्मीच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेला फेक नरेटीव्ह सेट करण्यात आला होता. त्यामुळे तो फेक नरेटीव्ह खोडण्यासाठी आपण एकत्र असणे गरजेचे असल्याचे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
समन्वय साधला तरच पुढचा काळ चांगला आहे,लोकसभेत वाद झाले नव्हते. परंतु तिकीट वाटपला उशीर झाला होता. आता तसे होणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षातील वरीष्ठ नेते ठरवतील असेही त्यांनी सांगितले. कोकणात ७४ जागा असून त्या सर्वच जागा महायुती लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले आणि त्याचा स्ट्राईक रेट हा ८५ टक्के पेक्षा पुढे असेल असा दावाही त्यांनी केला.
महायुतीच्या मेळाव्यातून आपण काय घेऊन जाणार आहोत हे महत्वाचे आहे. असे मेळावे घेण्यापेक्षा ज्यांची तोंड बघून लोक मत देतात त्यांची तोंडे एका दिशेने घ्या असा सल्ला माजी खासदार कपिल पाटील यांनी दिला. लोकसभेत ज्या चुका झाल्या त्या विधानसभेत होऊ नये, महायुतीचे सरकार हे महाराष्ट्राची गरज झाली आहे. गलती करो, बार बार करो, पर एक गलती बार बार मत करो असे सांगतांनाच एकमेकांच्या संख्या कमी करु नका अशा कानपिचक्या त्यांनी यावेळी दिल्या. कार्यकर्ते म्हणतात तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे कधी तरी म्हणा महायुती आगे बढो हम तुम्हारे साथ हे असेही ते म्हणाले. तर सव्वा दोन वर्षे या सरकारला झाली तरी सुध्दा लोकांना सांगाव लागत आहे, हे परिस्थिती योग्य नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मायक्रो लेव्हलला लोकांचे प्रेम महायुतीवर कमी झाले आहे, घडलेल्या चुकांचा हा रिझल्ट आहे. कोण म्हणत चुका घडल्या नाहीत. परंतु आता त्यातून सुधारुन काठावर यश नको घवघवीत यश हवे असल्याने त्यासाठी एकजूट हवी असा सल्ला आमदार गणेश नाईक यांनी दिला.
लोकसभेत ठाणे, पालघर कल्याण या तीन जागा निवडून आल्या. परंतु भिवंडीचा जागा पडली. परंतु विधानसभा निवडणुकीत अशा चुका होता कामा नये असा सल्ला खासदार नरेश म्हस्के यांनी दिला. विरोधकांकडून केवळ नरेटीव्ह पसरवले जात आहे. परंतु हा नरेटीव्ह खोडून काढणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
एकच गमछा महायुतीचा
निवडणुकीत प्रत्येक पक्ष हा वेगवेगळा गमछा घालून प्रचार करीत असतो. त्यातून काही वेळेस महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणे देखील होतात. मात्र आता महायुतीचा एकच गमछा ठेवा आणि त्यावर तीनही पक्षांचे चिन्ह ठेवा असा सल्लाही यावेळी देण्यात आला.