एकात्मिक स्मशानभूमीच्या काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:07+5:302021-09-21T04:46:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने सर्वधर्मीयांसाठी एकात्मिक स्मशानभूमीचा प्रस्ताव २०१६ मध्ये तयार केला होता. मात्र, या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने सर्वधर्मीयांसाठी एकात्मिक स्मशानभूमीचा प्रस्ताव २०१६ मध्ये तयार केला होता. मात्र, या स्मशानभूमीच्या कामाला अद्याप सुरुवातच केली नसल्याची माहिती सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघड झाली. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला जमिनीचा टीडीआर मिळाला असला तरी कन्स्ट्रक्शन टीडीआर मिळाला नसल्याने अद्याप या स्मशानभूमीचे काम सुरूच झाले नसल्याचे सभागृहात स्पष्ट झाले आहे. यावर महापौर नरेश म्हस्के यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, १५ दिवसांत संबंधित ठेकेदारांनी स्मशानभूमीचे काम सुरू केले नाही तर निविदा काढून ते सुरू करावे, असे स्पष्ट आदेश त्यांनी सभागृहात दिले.
ठाण्यातील सर्वधर्मीयांसाठी २०१६ मध्ये ठाणे महापालिकेने एकात्मिक स्मशानभूमीचा प्रस्ताव तयार केला होता. यासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. सुरुवातीला या स्मशानभूमीच्या जागेवरून वादंग निर्माण झाला होता. आता ओवळा या ठिकाणी ती बांधण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भात भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी तिचे काम अद्याप का सुरू केले नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर महापौर म्हस्के यांनी प्रशासनाकडून उत्तर मागितले. प्रशासनानेदेखील स्मशानभूमीच्या कामाला सुरुवातच झाली नसल्याची कबुली देऊन कन्स्ट्रक्शन टीडीआर मिळाला नसल्याने या कामाला सुरुवात झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या खुलाशानंतर महापौरांनी नाराजी व्यक्त करून येत्या १५ दिवसांत कामाला सुरुवात झाली नाही तर नव्याने निविदा काढून ठाणे महापालिकेनेच ते करावे, असे आदेश सभागृहात दिले.