कल्याण-शीळ रस्त्याचे काम होणार वर्षभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:38 AM2020-08-13T00:38:05+5:302020-08-13T00:38:10+5:30
खासदारांची माहिती; राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांसह केली खड्ड्यांची पाहणी
कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरी काँक्रिटीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी दिली.
भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी शिंदे यांनी केली. त्यानंतर ते बोलत होते. शीळ सर्कलपासून शिंदे यांनी पाहणी दौऱ्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापक राधेश्याम मोपलवार, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे आदी उपस्थित होते.
कल्याण-शीळ रस्त्यावर पावसामुळे पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, असे आदेश शिंदे यांनी यावेळी दिले. रस्त्यालगतच्या गावांतून वाहने थेट प्रमुख रस्त्यावर येतात. तेथे रस्ता उंच सखल आहे. तो नीट करावा, असे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे बंद असलेले या रस्त्याचे काम आता पुन्हा सुरू झाले आहे. मागील पाच महिन्यांत या रस्त्याचे काम शीळ ते कोनगाव या दरम्यान बºयापैकी पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्याचे भूसंपादन काही ठिकाणी झालेले नाही. या रस्त्याच्या यापूर्वीच्या कामाच्या वेळी काही लोकांना भूसंपादनाचा मोबदला दिला गेला नव्हता. महाविकास आघाडी सरकारने त्यांचाही विचार सहानुभूतीपूर्वक व संवेदनशील मनाने केला आहे. त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे. जेथे भूसंपादनाचा विषय रखडला आहे, तेथे काम सुरू करता आलेले नाही. ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्याचे भूसंपादन बाकी आहे. केडीएमसी हद्दीतील भूसंपादन पूर्ण झालेले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पाहणी दौºयावेळी पलावा जंक्शन येथे राज्य रस्ते विकास महामंडळाचे खड्डे बुजविण्याचे पथक भरपावसात खड्डे बुजविताना
दिसून आले.
पत्रीपूल महिनाभरात होणार खुला
खासदार शिंदे यांनी नवीन पत्रीपुलाच्या कामाचीही पाहणी केली. पत्रीपूल धोकादायक झाल्याने नियोजन नसताना तो पाडण्यात आला. तरीदेखील पत्रीपुलाच्या कामाला गती दिली आहे. वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. सध्या एक मोठा गर्डर चढविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा शिंदे यांनी केला आहे.