कल्याण-शीळ मार्गाचे काम संथगतीने, कल्व्हर्टचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:36 AM2021-03-15T04:36:21+5:302021-03-15T04:36:21+5:30
कल्याण : एमएसआरडीसीच्या अखत्यारित असणाऱ्या कल्याण-शीळ रोडचे काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. संबंधित विभागाकडून योग्य प्रकारे स्थानिक ग्रामस्थांना उत्तरे ...
कल्याण : एमएसआरडीसीच्या अखत्यारित असणाऱ्या कल्याण-शीळ रोडचे काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. संबंधित विभागाकडून योग्य प्रकारे स्थानिक ग्रामस्थांना उत्तरे दिली जात नसल्याने रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. उपस्थित केलेल्या मुद्यांचे निराकरण करून कल्याण-शीळ मार्गाचे काम जलद गतीने करावे, असे पत्र डोंबिवलीचे आमदार तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
कल्याण-शीळ रस्त्याचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडीचा त्रासही वाहनचालकांना होत आहे. यात वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागावे, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. दरम्यान, याबाबत आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून काम जलदगतीने व्हावे याकडे लक्ष वेधले आहे. यात ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्याही मांडल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. दोन्ही बाजूस पूर्वीची गावे आणि गावठाण भाग वसलेला आहे. या गावांतून होणारे मलनिस्सारण असेल किंवा नैसर्गिक नाले असतील, ज्यातून पावसात मोठा जलप्रवाह होतो. ही वस्तुस्थिती असताना ज्या रस्त्यांमध्ये सर्व गावांतील कल्व्हर्ट न बनविता संबंधित अधिकारी काम पुढे रेटून नेत आहेत. पिंपळेश्वर पॉइंट हॉटेल (ललित काट) सोनारपाडा मानगाव ते टाटा पॉवर लाइन गोळवलीपर्यंत अंदाजे १२ ते १३ कल्व्हर्ट होते. आता त्यापैकी एकाही ठिकाणी कल्व्हर्ट केला गेलेला नाही. गोळवली भागात अंदाजे सात ते आठ कल्व्हर्ट आहेत.
अधिकाऱ्यांशी चर्चा
ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, याकडे चव्हाण यांनी पत्रात लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे, एमएसआरडीसीचे राधेशाम मोपलवार आणि केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनाही चव्हाण यांनाही पत्रव्यवहार केला आहे.
-------------------------------------------------------