कोपर उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:43 AM2021-08-27T04:43:20+5:302021-08-27T04:43:20+5:30
कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, तो गणेश चतुर्थीपूर्वी वाहतुकीस खुला केला जाणार ...
कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, तो गणेश चतुर्थीपूर्वी वाहतुकीस खुला केला जाणार आहे. दरम्यान, या पुलाची गुरुवारी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पाहणी केली.
म्हात्रे म्हणाले, अनंत अडचणींवर मात करून दोन वर्षांत नवीन कोपर पूल उभारण्यात आला आहे. या कामासाठी १० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पुलाच्या कामाला विलंब झाला. पूल मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला असून, या कामाचे श्रेय त्यांना जाते. केडीएमसीचे अधिकारीही त्यासाठी झटत होते. मात्र, पुलाच्या कामात काही पक्षाचे लोक अडचणी आणत होते. त्यांनी पुलालगतच्या बिल्डिंग वाचविण्याचा प्रयत्न केला. पुलाच्या लोकार्पण सोहळ्यास त्यांनाही बोलाविण्यात येईल, असा चिमटा काढून भाजपचा नामोल्लेख न करता भाजपवर म्हात्रे यांनी टीका केली.
या टीकेसंदर्भात भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे म्हणाले, कोपर पुलाच्या कामाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला देऊन चालणार नाही. त्यासाठी सगळेच लोक पाठपुरावा करीत होते. मी स्वत: रेल्वेसोबतच्या सर्व बैठकांना हजर होतो. पुलालगतच्या बिल्डिंगमधील घरे वाचविण्याचा प्रयत्न केला. तेथील रहिवाशांचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी नागरिकांच्या वतीने केल्यास त्यात गैर काय? पुलाच्या कामाला त्यांचा विरोध नव्हता. केवळ पुनर्वसन करण्याची त्यांची मागणी होती. शिवसेनेच्या लोकांनी एखाद्या गोष्टीसाठी मागणी केल्यास ती जनहिताची आणि आमच्या पक्षाने मागणी केल्यास विकासकामांत अडथळा कसा, असा प्रतिप्रश्न हळबे यांनी केला आहे.
ठाकुर्ली पूल रुंद करण्याची मागणी का केली नाही?
कोपर पूल हा महत्त्वाचा पूल आहे; पण ठाकुर्ली पूल होत असताना तो रुंद केला जावा अशी मागणी त्यावेळी म्हात्रे यांनी का केली नाही, असा टोला हळबे यांनी म्हात्रे यांना लगावला आहे.
---------------------