उल्हासनगरात उल्हास नदी किनारी घाटाचे काम; पर्यावरण प्रेमीकडून विरोधाची शक्यता
By सदानंद नाईक | Published: November 21, 2022 05:46 PM2022-11-21T17:46:30+5:302022-11-21T17:47:30+5:30
उल्हास नदी किनारी सर्व नियम डावलून घाट बांधन्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
सदानंद नाईक
उल्हासनगर: हरिद्वार गंगा घाटाच्या धर्तीवर शहरातील उल्हास नदी किनारी घाट बांधण्याचे काम २ कोटीच्या निधीतून गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली. घाटावर बहराना साहेब व झुलेलाल कार्यक्रम, छट पूजा, गणेश विसर्जन, माता का जागरण व दशक्रिया कार्यक्रम साजरे होणार असल्याचे संकेत आयलानी यांनी दिले.
उल्हासनगर कॅम्प नं-१ रिजेन्सी-अंटेलिया येथून वाहणाऱ्या उल्हास नदी किनारी हरिद्वार गंगाघाटच्या धर्तीवर घाट बांधण्यात येणार आहे. कुमार आयलानी यांनी त्यासाठी शासनाकडून २ कोटीचा निधी आणल्याची माहिती दिली. घाटाच्या कामाचे काम उल्हास नदी किनारी सुरू झाले. घाटाचे काम पूर्ण झाल्यास, घाट हे एक शहराच्या आकर्षणाचे केंद्र बनणार असल्याचे आयलानी म्हणाले. घाटाची लांबी ७०० फूट असणार असून याठिकाणी सार्वजनिक शौचालय, सर्वत्र लायटिंग, सुशोभीकरण, विविध झाडे लावणे, तसेच नदीत बोटिंग सुरू करण्याचा मानस आयलानी यांनी व्यक्त केला.
हरिद्वार गंगाघाटा प्रमाणे येथे सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून सिंधी समाजाचा बहराना व झुलेलाल कार्यक्रम, माता का जागरण, छट पूजा, दशक्रिया विधी आदी कार्यक्रम घाट ठिकाणी होणार आहे. या व्यतिरिक गणेश विसर्जन, देवी विसर्जनही याठिकाणी होणार आहे. मात्र घाट बांधण्यात येतो. त्याठिकाणी अनेक झाडाची कत्तल झाल्याचे बोलले जात असून पावसाळ्यात नदीच्या पुरात घाट वाहून जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. उल्हासनगर हद्दीतील उल्हास नदी किनारी घाटाचे काम सुरू असताना, महापालिकेची रीतसर परवानगी घेतली का? असा प्रश्नही विचारला जात आहे. घाटामुळे परिसराला पुराचा धोका वाढल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
पर्यावरण संस्थेकडून विरोधाची शक्यता
उल्हास नदी किनारी सर्व नियम डावलून घाट बांधन्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या घाटाच्या कामाने पर्यावरणाला धोका निर्माण होणार असल्याचे बोलले जात असून पर्यावरणवादी य विरोधात उभे टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"