गुडन्यूज! ठाणे-दिवा दरम्यान रेल्वेच्या 5व्या मार्गिकेचे काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 03:03 PM2022-01-24T15:03:17+5:302022-01-24T15:03:40+5:30
6 व्या मार्गिकेसाठी 72 तासांचा मेगाब्लॉक; खासदार डॉ. शिंदे यांची माहिती
डोंबिवली: मध्य रेल्वेच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या ठाणे - दिवा दरम्यानच्या 5 व्या - 6व्या मार्गपैकी 5 व्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. काल 23 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकदरम्यान हे काम पूर्ण झाले असून 6 व्या मार्गिकेचे कामही काही दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने ही 5 वी - 6 वी मार्गिक अत्यंत महत्वाची आहे. गेल्या 14 वर्षांपासून त्यांचे काम सुरू असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे त्याला मोठी गती प्राप्त झाली आहे. परिणामी अवघ्या काही महिन्यातच हे काम अंतिम टप्प्यात आले असून काल 5 व्या मार्गिकेचे काम पूर्णत्वास गेले. तसेच पूर्ण झालेल्या या मार्गाची रेल्वे प्रशासनाने रिकामी लोकल चालवून चाचणीही केली. तर 6व्या मार्गिकेसाठी येत्या 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यानच्या 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आल्याची माहितीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
सद्यस्थितीत या मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या (एक्सप्रेस) गाड्यांमुळे उपनगरीय गाड्यांच्या गतीवर परिणाम होत आहे. अनेक वेळा एक्सप्रेस क्रॉसिंगकरिता लोकल गाड्या थांबवून ठेवाव्या लागातात. परंतु या 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गिका खुल्या झाल्यावर जलद, धिम्या लोकल सेवा आणि एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहेत. परिणामी क्रॉसिंगमुळे वाया जाणारा लोकल प्रवाशांचा वेळ वाचणार असून उपनगरीय रेल्वे सेवा अधिक गतिमान होईल. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कल्याण तसेच ठाणे ते कल्याण मार्गावर लोकल फेऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होऊन प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.