उल्हासनगर स्टेशनकडील वालधुनी नदीच्या पुलाचे काम रखडले, बांधकाम विभाग वादात
By सदानंद नाईक | Published: January 2, 2023 05:38 PM2023-01-02T17:38:18+5:302023-01-02T17:38:42+5:30
धुमधडाक्यात भूमिपूजन झालेल्या उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिक व रिक्षाचालकांची गैरसोय होत असून महापालिका बांधकाम विभागावर टीकेचे झोळ उठली आहे.
उल्हासनगर : धुमधडाक्यात भूमिपूजन झालेल्या उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिक व रिक्षाचालकांची गैरसोय होत असून महापालिका बांधकाम विभागावर टीकेचे झोळ उठली आहे.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिमकडे नागरिक व वाहनाना वालधुनी नदीवरील जुन्या पुलावरून जावे लागत होते. मात्र पूल उंचीने लहान असल्याने, पावसाळ्यात पुलावरून पाणी जात होते. अश्या धोकादायक पुलाच्या जागी नवीन उंच पूल बांधण्याची मागणी विविध राजकीय पक्षासह स्थानिक माजी नगरसेवक गजानन शेळके, सविता तोरणे-रगडे, टोनी सिरवानी, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी महापालिकेकडे केली. टोनी सिरवानी हे स्थायी समिती सभापती पदी असताना पूल पुनर्बांधणीला मंजुरी दिली. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन महापालिकेने दिले. जुना पूल पाडून त्याजागी नवीन पुलाचे भूमिपूजन विविध पक्षाचे नेते व महापालिका अधिकारी यांच्या गेल्या काही महिन्यापूर्वी हस्ते झाले. दरम्यान जुन्या पुला शेजारून गेलेल्या जलवाहिनीचे स्थलांतर केल्यावर नवीन पुलाचे काम सुरू होणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पुलाच्या कामाला मुहूर्त लागला नाही.
वालधुनी नदीवरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मात्र जो पर्यंत पुला शेजारील जलवाहिनीचे स्थलांतर होणार नाही. तोपर्यंत पुलाच्या कामाला मुहूर्त लागणार नाही, असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत साळुंके यांना पुलाच्या प्रगती बाबत संपर्क केला असता, होऊ शकला नाही.
पूर्वीपासूनच रस्ते बांधणी बाबत वादात सापडलेले बांधकाम विभाग व कार्यकारी अभियंता प्रशांत साळुंके यांच्यावर शहरातून टीकेची झोळ उडाली आहे. वालधुनीवरील पुलाचे काम रखडल्यास पावसाळ्यात रेल्वे स्टेशनकडे जाणार कसे? असा प्रश्न शिवाजी रगडे यांनी महापालिका आयुक्तांना केला. पुलाचे काम सुरू केले नाहींतर, गेल्या वेळी प्रमाणे आंदोलनाचा इशारा सामाजिक संघटनेसह शिवाजी रंगडे यांनी दिला आहे.