पत्रीपुलाचे काम मार्गी लागले; मात्र लोकसुरभीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:40 AM2021-03-26T04:40:25+5:302021-03-26T04:40:25+5:30
कल्याण : कल्याणचा बहुचर्चित पत्रीपुलाचे काम मार्गी लागले. मात्र, या कामामुळे पत्रीपुलानजीक असलेल्या लोकसुरभी सोसायटीची ड्रेनेजलाइन फुटली असून, वारंवार ...
कल्याण : कल्याणचा बहुचर्चित पत्रीपुलाचे काम मार्गी लागले. मात्र, या कामामुळे पत्रीपुलानजीक असलेल्या लोकसुरभी सोसायटीची ड्रेनेजलाइन फुटली असून, वारंवार पाठपुरावा करूनदेखील तिची दुरुस्ती केली जात नसल्याने सोसायटीतील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने रहिवाशांना नाक मुठीत धरून राहावे लागत आहे.
या सोसायटीत राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रीती शर्मा यांनी सांगितले की, पत्रीपुलाचे काम सुरू असताना ही ड्रेनेजलाइन फुटली. यासंदर्भात महापालिकेसह राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा करूनदेखील ती दुरुस्त करून दिलेली नाही. तर दुसरे रहिवासी नसीम अन्सारी यांनी सांगितले की, सोसायटीच्या प्रवेशद्वार आणि मागच्या बाजूला दुर्गंधी पसरली आहे. पत्रीपुलाच्या कामासाठी सोसायटीने सहकार्य केले. त्याचा त्रास आता सोसायटीलाच सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले.
यासंदर्भात महापालिकेचे अभियंता अनंत मादगुंडी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सोसायटीची ड्रेनेजलाइन पत्रीपुलाचे काम करताना तुटल्याचे मान्य आहे. ज्या वेळी सोसायटीतून कॉल येतो तेव्हा त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन तुंबलेले ड्रेनेज साफ केले जाते. त्यात माती - दगड गेल्याने लाइन चोकअप झाली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने ही लाइन शिफ्ट करून मुख्य ड्रेनेजलाइनला जोडली पाहिजे. त्यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठविला आहे. स्वच्छतेसंदर्भात तक्रार आल्यावर महापालिकेकडून स्वच्छता केली जात आहे.
-------------------