रिंग रोडच्या कामाला मिळाली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:45 AM2021-08-14T04:45:18+5:302021-08-14T04:45:18+5:30
कल्याण : वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोड प्रकल्पातील दुर्गाडी ते मांडा टिटवाळादरम्यान असलेल्या नदी पूल ते ...
कल्याण : वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोड प्रकल्पातील दुर्गाडी ते मांडा टिटवाळादरम्यान असलेल्या नदी पूल ते अटाळी हद्दीपर्यंत ६०० मीटरच्या अंतरात रस्त्याच्या आड येणारी झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे रिंग रोडच्या ६०० मीटरच्या कामाला गती मिळणार आहे.
झाडे तोडण्यास केडीएमसीच्या वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईवेळी विभागीय उपायुक्त अर्चना दिवे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, एमएमआरडीएचे अधिकारी जयवंत ढाणे, ‘अ’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी राजेश सावंत आदी उपस्थित होते.
रस्त्याच्या लगत असलेल्या गटारांचे काम सुरू करण्यात येणार आहे. रिंग रोड प्रकल्पात बाधित झालेली झाडे तोडण्यापूर्वी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आंबिवली टेकडी परिसरात १५ हजार झाडे लावली आहेत. तेथे वनराई फुलली असून, फुलपाखरू उद्यान व जैवविविधता असलेले बोटॅनिकल उद्यानही विकसित केले जाणार आहे. प्रकल्पातील बाधित झाडे तोडल्यावर प्रति झाड १० हजार रुपये मोबदला देण्याचा ठराव मनपाच्या महासभेत मंजूर झालेला आहे. त्यानुसार ताडाच्या झाडासाठी १० हजार रुपये दिले जातील, अशी माहिती उद्यान अधीक्षक जाधव यांनी दिली आहे.
दरम्यान, महिनाभरापूर्वी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमवेत दौरा करून रिंग रोडच्या दुर्गाडी ते मांडा टिटवाळा या कामाला गती देण्याचे आदेश दिले होते. तसेच हा रस्ता जिथे संपतो, तेथून तो पुढे गोवेली येथे कल्याण-मुरबाड-नगर मार्गाला जोडावा. त्याचबरोबर रिंग रोडच्या मोठागाव ठाकुर्ली ते दुर्गाडी या तिसऱ्या टप्प्याची निविदा लवकर काढावी. दुसऱ्या व पहिल्या टप्प्याच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रियेस गती द्यावी, असे सूचित केले होते. त्यासाठी त्यांनी एमएमआरडीए आयुक्तांची भेटही घेतली होती.
-------------------