ठाणे पूर्वच्या सॅटिसच्या कामाला झाली सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:23 AM2020-01-06T01:23:40+5:302020-01-06T01:23:57+5:30
मनोरुग्णालयाजवळील नवीन रेल्वेस्टेशनला गती मिळत असतानाच आता ठाणे पूर्वेकडील सॅटिस प्रकल्पाचेदेखील काम सुरू झाले आहे.
अजित मांडके
ठाणे : मनोरुग्णालयाजवळील नवीन रेल्वेस्टेशनला गती मिळत असतानाच आता ठाणे पूर्वेकडील सॅटिस प्रकल्पाचेदेखील काम सुरू झाले आहे. ३६ महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार, दोन पिलरचे पायलिंग झाल्याची माहिती पालिकेने दिली. या सॅटिसमध्ये सहा मीटर उंचीचा डेक असणार असून त्यावर १४ बसथांबे असणार आहेत. शिवाय, बससाठी सात हजार स्क्वेअर मीटरचा टर्मिनलही उभारला जाणार आहेत. पूर्वेकडील बाजूस ११ हजार १०० चौरस मीटर जागा असून, त्यापैकी १० हजार चौ.मी. जागा रेल्वेची, तर ११०० चौ.मी. जागेवर रस्ता आहे. कोपरी पुलापासून स्टेशनपर्यंत तीन किमी लांबीचा फ्लायओव्हर केला जाणार आहे. यासाठी २६५ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे.
।‘ज्ञानसाधना’जवळ आरओबी प्रस्तावित
ठाणे पूर्व येथे सॅटिस-२ प्रकल्प राबविण्यास व एलिव्हेटेड कॉरिडोर विकसित करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. या योजनेमध्ये नवीन कोपरी पुलाच्या बाजूस नव्याने आरओबी बांधून ठाणे रेल्वेस्थानकापर्यंत किमान ५.५० मी. उंचीवर तीन मार्गिकांचा एलिव्हेटेड रोड बांधून तो मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. यांच्यामार्फत प्रस्तावित वाणिज्यिक विकासाखालील डेकला जोडण्यात येणार आहे. त्यानंतर, पुढे लोकमान्य टिळक मार्ग-कृष्णा बोरकर मार्गावर दोन मार्गिकांचा एलिव्हेटेड रोड बांधून पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडून आनंदनगर बाजूस उतविण्यात येण्याचे व त्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ दुसरा आरओबी बांधण्याचे प्रस्तावित आहे.
>बस टर्मिनलसह पार्किंगची सोय
कोपरी पुलाच्या बाजूला पार्किंगकरिता आरक्षण व फूड कॉर्पोरेशन इंडियाचे जागेवर बस टर्मिनल बांधण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. मंजूर सुधारित विकास आराखड्यानुसार नियोजित आरक्षण बगिच्याचे तीन हजार चौरस मीटर आणि गोडाउन झोनचे तीन हजार चौरस मीटरचे आरक्षण सध्या येथे आहे. परंतु, आता बगिच्याच्या आरक्षणाच्या जागी पार्किंग आणि गोडाउन झोनच्या जागी बस टर्मिनल असा फेरबदल केला असून त्याला महासभेनेदेखील मान्यता दिली आहे. याठिकाणी जे पार्किंग प्लाझा उभारले जाणार आहे, त्यावर ७० च्या आसपास फोर व्हीलर आणि १५० ते २०० दुचाकी पार्क होऊ शकणार आहेत.
>३० बांधकामे बाधित
या सॅटिस प्रकल्पामध्ये कोपरी पोलीस स्टेशनच्या आजूबाजूची २५ ते ३० बांधकामे बाधित होणार आहेत. परंतु, त्यांचे पुनर्वसन महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे. ठाणे पूर्वेची कोंडी येत्या काळात फुटणार आहे. या प्रकल्पावर २६५ कोटींचा खर्च अपेक्षित असून येत्या ३६ महिन्यांत हे काम मार्गी लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
>तीन चटईक्षेत्र मंजूर, प्रशस्त पार्किंग प्लाझाही उभारण्याचे नियोजन
पूर्वेकडील बाजूस ११ हजार १०० चौरस मीटर जागा असून त्यापैकी १० हजार चौ.मी. जागा रेल्वेची असून ११०० चौ.मी. जागेवर रस्ता आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कोपरी पुलापासून जो तीन किमी लांबीचा रस्ता स्टेशनपर्यंत येतो, तेवढा फ्लायओव्हर केला जाणार आहे. त्याशिवाय, स्टेशनसमोरील जागेवर पश्चिमेच्या धर्तीवर सहा मीटर उंचीचा एक डेक उभारला जाणार असून वरील बाजूस टीएमटी, एसटी आणि बेस्टच्या बसचे १४ थांबे असणार आहेत. तर, तळमजल्यावर रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. या जागेवर प्रशस्त पार्किंग प्लाझाही उभारण्याचे नियोजन आहे. रेल्वेच्या १० हजार चौरस मीटर जागेवर १२ मीटरच्या वरील जागेचा व्यावसायिक वापर रेल्वेला करू दिला जाणार आहे. या योजनेसाठी तीन एफएसआय मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे ईस्ट आणि वेस्टचा सॅटिस जोडण्याचेही यामध्ये प्रस्तावित आहे.