मोठागाव ठाकुर्ली-माणकोली पुलाचे काम रखडले
By Admin | Published: January 28, 2017 02:37 AM2017-01-28T02:37:24+5:302017-01-28T02:37:24+5:30
मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाचे चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात
डोंबिवली : मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाचे चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. कामाच्या ठिकाणी साहित्य आले आहे. मात्र, पुलासाठी जमीन संपादितच न झाल्याने कामाला प्रारंभ होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्याला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. यासंदर्भात म्हात्रे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.
मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली या खाडीपुलाच्या कामाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते १८ सप्टेंबर २०१६ ला झाले. एमएमआरडीए २२६ कोटी रुपये खर्चून हा सहापदरी पूल उभारत आहे. या पुलाच्या कामाच्या भूमिपूजनावरून शिवसेना-भाजपा आमने-सामने आले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होण्यापूर्वीच शिवसेनेने या कामाचे भूमिपूजन करून राजकीय धुराळा उडवून दिला होता. मात्र, कामाचे भूमिपूजन होऊन चार महिने उलटले, तरी अद्याप कामाला एक इंचही सुरुवात झालेली नाही. कामासाठी कामाच्या ठिकाणी साहित्य येऊन पडले आहे. पुलाच्या डोंबिवलीकडील ठाकुर्ली मोठागावची जागा, तर पलीकडे भिवंडी भागातील जागा अद्याप संपादित झालेली नाही. काही जागा ही सीआरझेडमध्ये येते. शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला विरोध केला आहे. जमीन संपादित झालेली नसताना भूमिपूजन लवकर उरकले गेले. त्यामुळे काम रखडले आहे.
महापालिका आयुक्तांनी जमीन बाधितांना नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र, त्यांना मोबदला हवा आहे. आयुक्तांच्या मते बाधितांनी प्रथम जमीन द्यावी. मग, मोबदल्याचा विचार केला जाईल. एमएमआरडीएच्या मते आम्ही प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. कंत्राटदार नेमला आहे. जमीन संपादन हा भाग महापालिकेचा आहे. प्रकल्पाला उशीर झाल्यावर एमएमआरडीएला त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. प्रकल्प वेळेत सुरू होऊन पूर्ण झाला नाही, तर प्रकल्पाच्या खर्चाची रक्कम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाशी कल्याण-डोंबिवलीचा रिंगरूट संबंधित आहे. पूल तयार होत नसल्याने रिंगरूटलाही बाधा येत आहे. रिंगरोड हा ८०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्पही एमएमआरडीए उभारेल, असे मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात स्पष्ट केले होते. (प्रतिनिधी)