भाईंदरच्या डोंगरी येथील १२ मीटर रस्ता रुंदीकरणाच्या कामास होणार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 01:45 PM2020-11-17T13:45:51+5:302020-11-17T13:47:51+5:30
Mira Bhayandar : डोंगरी पाण्याची टाकी ते आनंद नगर तलाव पर्यंत १२ मीटर तर तेथून पुढे काका बॅप्टिस्टा चौक पर्यंत २० मीटर रुंद रस्ता विकास आराखड्यात दर्शविलेला आहे.
मीरारोड - भाईंदरच्या डोंगरी गावातून जाणाऱ्या १२ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असून आनंद नगर ते काका बाप्टिस्टा चौक पर्यंतच्या २० मीटर रास्ता रुंदीकरणाच्या कामास स्थानिकांचा विरोध कायम आहे.
डोंगरी पाण्याची टाकी ते आनंद नगर तलाव पर्यंत १२ मीटर तर तेथून पुढे काका बॅप्टिस्टा चौक पर्यंत २० मीटर रुंद रस्ता विकास आराखड्यात दर्शविलेला आहे. त्यामुळे १२ मीटर सुरवातीला रस्ता असताना पुढे २० मीटर रस्ता करण्यास स्थानिक नागरिकांसह नगरसेवकांचा विरोध आहे.
त्या अनुषंगाने महापौर ज्योत्सना हसनाळे यांच्या कडे स्थानिक नगरसेवक, नागरिक, चर्चचे फादर व पालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली होती. बैठकीत देखील स्थानिकांनी २० मीटर रस्त्यास विरोध करून १२ मीटर आहे टेकधच पुढे देखील रस्ता करावा अशी स्पष्ट भूमिका घेतली होती.
बैठकीच्या अनुषंगाने महापौरांनी नुकतीच डोंगरी भागातील सध्याचा रास्ता आणि प्रस्तावित रस्ता अनुषंगाने पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेवकांसह ग्रामस्थ, पालिका अधिकारी उपस्थित होते. डोंगरी येथील १२ मीटर इतका रस्ता रुंद करताना मोकळ्या जागेचा भाग घ्यावा. बाधितांना तातडीने मोबदला देण्यात यावा. व रस्त्याचे काम सुरु करावे. तसेच आनंद नगर तलाव ते काका बॅप्टिस्टा चौका पर्यंत २० मीटर ऐवजी १२ मीटर रस्ताच रुंद करावा अशी भुमीका कायम असल्याचे नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी सांगितले.