काम केले एनजीओने, पैसे काढले बांधकाम विभागाने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 11:54 PM2020-08-11T23:54:30+5:302020-08-11T23:54:32+5:30
जि.प. शाळा दुरुस्ती : भ्रष्टाचाराचा ग्रामस्थांचा आरोप, तर काम वेगवेगळे असल्याचा अभियंत्यांचा दावा
जव्हार : तालुक्यातील देहरे देवगाव या जि.प. शाळेची दुरुस्ती एका एनजीओमार्फत केली होती. मात्र, एनजीओने केलेल्या या शाळेच्या कामाचे आयते अंदाजपत्रक बनवून जि.प. बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांनी पुन्हा याच शाळेवर दोन लाख २० हजार रुपये खर्च करून संबंधित ठेकेदाराला देयके अदा करून निधी बळकावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शाळा दुरुस्तीच्या नावाखाली देवगाव शाळेचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मंजूर करून घेतले. या भ्रष्टाचाराची ग्रामस्थांना कुणकुण लागली. मागील आठवड्यात शाळेच्या दुरुस्ती सुरू झाली; मात्र ग्रामस्थांनी हे काम थांबवल्यामुळे हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आला आहे. २०१७-२०१८ मध्ये जव्हार तालुक्यातील देवगाव जि.प. शाळेची वर्गखोली दुरुस्तीचे काम ‘वरले पर्सन’ या एनजीओने केले होते. तसेच जि.प.चे शाखा अभियंता एस.जी. वाघमारे यांनी दोन लाख २० हजार इतक्या रकमेचा अंदाजपत्रक बनवून मर्जीतील ठेकेदारांना पुन्हा याच शाळेच्या दुरुस्तीचे काम दिले व या रकमेचा निधी काढल्याचा प्रकार गावातील सुशिक्षित तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील वरिष्ठ नागरिकांना सांगितले. त्यानंतर जव्हार पंचायत समिती बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणाची तत्काळ चौकशी करून त्या भ्रष्ट अभियंत्यावर आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, ग्रामस्थांना देवगाव शाळा दुरुस्तीची माहिती देण्यास जि.प. टाळाटाळ करत आहे. जव्हार तालुक्यात पाच वर्षांत वरले पर्सन एनजीओने केळीचापाडा, चौथ्याचीवाडी, फरळेपाडा, रोजपाडा, देवगाव, घोरपट्टेप, कोगदा, कुंभारखांड, सावरपाडा, मोठा मेढा अशा एकूण १० जि.प. शाळा दुरुस्तीची कामे करून दिली आहेत. एनजीओमार्फत केलेल्या दुरुस्तीपैकी मोठा मेढा व सावरपाडा या शाळांची खोटी दुरु स्ती दाखवून बिल काढल्याची चर्चा आहे.
एनजीओने परस्पर दुरुस्तीचे काम न कळविता केले आहे; आणि एनजीओने केलेले काम आणि आम्ही केलेले काम वेगवेगळे आहे. यात कुठलाच भ्रष्टाचार झालेला नाही.
- एस.जी. वाघमारे, शाखा अभियंता, जि.प. बांधकाम विभाग, जव्हार
देवगाव जि.प. शाळा दुरुस्ती दाखवून बिले काढली आहेत. त्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा. आम्ही ग्रामस्थ या गंभीर प्रकरणाबाबत आमदारांना भेटून कारवाईची मागणी करणार आहोत.
- सदाशिव भोये, सामाजिक कार्यकर्ते