चोरी करुन ठाण्यातून राजस्थानमध्ये पसार झालेल्या कामगारास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:04 PM2021-07-21T23:04:11+5:302021-07-21T23:16:03+5:30
डायघर भागातील एका कारखान्यातून ७० हजारांच्या ऐवजाची चोरी करुन राजस्थानमध्ये पसार झालेल्या सुरजित सिंग (३२, रा. सेदमपूर, जि. अलवर, उत्तरप्रदेश) या कर्मचाऱ्याला डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून हा ७० हजारांचा पार्टही जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: डायघर भागातील एका कारखान्यातून ७० हजारांच्या ऐवजाची चोरी करुन राजस्थानमध्ये पसार झालेल्या सुरजित सिंग (३२, रा. सेदमपूर, जि. अलवर, उत्तरप्रदेश) या कर्मचाऱ्याला डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
खर्डीतील निर्मलनगरी येथील रमेश पटेल (२९) यांच्या टोटो प्रिस्ट्रेसिंग सिस्टीम आर. एम. सी. सप्लाय या कारखान्यामध्ये काम करणारा सुरजित सिंग आणि त्याचा साथीदार पवन राजपूत (२१, रा. राजोथान)आणि अस्लम खान (३२, रा. उत्तरप्रदेश) यांनी आपसात संगनमत करुन पटेल याच्या कारखान्यातील ७० हजारांच्या एका इलेक्ट्रॉनिक पार्टची चोरी केली. हा पार्ट त्यांनी काढून ते राजस्थानमध्ये पसार झाले होते. हा प्रकार १९ मे रोजी पहाटे १ ते सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी बरीच शोधाशोध घेऊनही हा ऐवज न मिळाल्याने पटेल यांनी अखेर याप्रकरणी २३ मे २०२१ रोजी चोरीची तक्रार दाखल केली होती. सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक मुजावर आणि रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कापडणीस यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राजस्थानमध्ये पसार झालेला सुरजित सिंग याचा शोध घेतला. त्याला १८ जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आली असून त्याला २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे. मालकाने पगाराचे पैसे वेळेवर न दिल्याने त्यांनी त्याच कारखान्यातील इलेक्ट्रॉनिक पार्टची चोरी केल्याचीही कबूली पोलिसांना दिली. त्याच्याकडून हा ७० हजारांचा पार्टही जप्त करण्यात आला आहे.