पाणी प्रश्नावर श्रमजीवी आक्रमक; भिवंडीत एक हाती हंडा, एक हाती दांडा मोर्चाचे आयोजन
By नितीन पंडित | Published: April 4, 2024 05:51 PM2024-04-04T17:51:14+5:302024-04-04T17:51:53+5:30
भिवंडी तालुक्यात असंख्य गावात आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
नितीन पंडित, भिवंडी: तालुक्या तील असंख्य गावात आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून या विरोधात श्रमजीवी संघटनेच्या कातकरी घटकाचे जिल्हाध्यक्ष जयेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ महिलांनी मालबीडी सूर्यानगर ग्रामपंचायती वर एका हाती हंडा, एका हाती दांडा या मोर्चाचे आयोजन गुरुवारी केले होते.या आंदोलनात तालुका पदाधिकारी भूषण घोडविंदे,नवनाथ भोये, सुरेश रावते,इंद्रसेन ठाकरे,सागर जाधव, अक्षय वाघे यांसह गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत क्षेत्रात कोट्यावधी रुपये खर्च करून जलजिवन मिशन अंतर्गत हर घर नळ हर घर जल ही योजना राबविण्यास घेतली.परंतु दोन वर्षांहून अधिक काळ झाला तरी बहुतांश गावातील योजना आज ही अपूर्ण आहेत.तर अनेक गावातील कामे ठेकेदारांनी अत्यंत हलक्या दर्जाची कुचकामी ठरणारी केली असल्याचा आरोप होत आहे.तालुक्यातील मालबिडी सुर्यानगर या गावासाठी २०२० मध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर झाली परंतु तीन वर्षाची मुदत संपून ही गावातील कुटुंबीयांना नळाद्वारे पाणी उपलब्ध झाले नसून बोअरवेल मधून सुध्दा उन्हाळ्यात पाणी येत नसल्याने गावातील कुटुंबीय तहानलेले आहेत असा आरोप श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा कातकरी घटक प्रमुख जयेंद्र गावित यांनी केला आहे.
या गावातील योजना ही पुढील तीस वर्षांसाठी कार्यान्वित राहणार आहे परंतु त्यासाठी पाईप लाईन अवघी एक फूट खोल असल्याने ती कधी ही उखडू शकते ,कोट्यावधी रुपये खर्च करूनही ही योजना कार्यान्वित करण्यात पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग व संबंधित ठेकेदार अपयशी ठरल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी असून त्याच साठी गावातील महिला एका हाती हंडा तर एका हाती दांडा असे अभिनव आंदोलन केल्याची माहिती जयेंद्र गावित यांनी दिली आहे.