कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी केले कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:45 AM2019-11-22T00:45:24+5:302019-11-22T00:45:27+5:30
जागोजागी कचऱ्याचे ढीग; वेतन न मिळाल्याने उचलले पाऊल
कल्याण : डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराने पूर्वेतील भागात थैमान घातले असताना दुसरीकडे वेतन न मिळाल्याने कंत्राटदाराच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे येथील ‘ड’ आणि ‘जे’ प्रभागांत कचºयाचे ढीग पाहायला मिळाले.
स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत केडीएमसीकडून स्वच्छता राखण्याचा दिंडोरा पिटविला जात असताना वेतन थकल्याने तसेच ते अत्यल्प मिळत असल्याच्या निषेधार्थ कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनामुळे स्वच्छतेच्या उपक्रमालाच एक प्रकारे हरताळ फासला गेला. केडीएमसीतील १० पैकी चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा संकलनासाठी खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्यात पश्चिमेतील ‘ब’, ‘क’ तर, पूर्वेतील ‘ड’, ‘जे’ प्रभागांचा समावेश आहे. या प्रभागांतील रहिवाशांच्या घरातील कचरा कंत्राटदाराच्या कामगारांकडून गोळा केला जाणार असल्याने कचराकुंड्यांची आवश्यकता भासणार नाही, असा दावा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला होता. परंतु, नेमकी उलटी परिस्थिती पाहायला मिळत असल्याने कचराकुंडीमुक्त प्रभाग हे उद्दिष्ट कागदावरच राहिले आहे.
केडीएमसीच्या परिवहन विभागात नेहमीच कर्मचाºयांच्या वेतनाची बोंबाबोंब असते. परंतु, आता घनकचरा व्यवस्थापन विभागातही हे चित्र दिसत आहे. कचरा संकलन व वाहतुकीसाठी नेमलेल्या कंत्राटदाराच्या चालक व कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही. जे मिळते तेही अपुरे आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी पूर्वेतील ‘जे’ आणि ‘ड’ प्रभागांतील संबंधित कर्मचाºयांनी सकाळच्या सत्रात कचरा उचलला नाही. त्यामुळे जागोजागी कचºयाचे ढीग जमा झाले होते.
१७ मे २०१९ पासून खाजगी कंत्राटदारामार्फत कचरा संकलनाचे काम सुरू करण्यात आले. ‘जे’ आणि ‘ड’ प्रभागांत कंत्राटदाराचे १५० कर्मचारी आहेत. यातील सफाई कामगारांना १३ हजार वेतन मिळते, तर मोठे वाहन चालविणाºयाला १५ हजार, तर घंटागाडीच्या चालकाला १४ हजार वेतन मिळते. बायोमेट्रीक हजेरीनुसार त्यांचे वेतन काढले जाते. परंतु, वेतन हे अत्यल्प मिळते, असा कर्मचाºयांचा आरोप आहे. तसेच वेतन वेळेवरही मिळत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. याच्या निषेधार्थ त्यांनी गुरुवारी हे आंदोलन केले.
दुसºया सत्रात काम सुरू
बायोमेट्रीक प्रणालीच्या हजेरीतील नोंदीनुसार कर्मचाºयांना वेतन दिले जाते. परंतु, काहींचे लेटमार्क लागत असल्याने त्याप्रमाणेच वेतन अदा केले जात आहे. बायोमेट्रीकला कर्मचाºयांचा विरोध आहे. त्यात वेतन मिळत नाही, अशीही त्यांची तक्रार आहे. येत्या दोन दिवसांत वेतन अदा केले जाणार आहे. सकाळच्या सत्रात कामबंद केले होते. परंतु, दुपारी दुसºया सत्रात कचरा उचलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, असे कंत्राटदाराचे सुपरवायझर नारायण घोडके यांनी सांगितले.