भिवंडी मनपाच्या हंगामी कामगारांचे चार महिन्याचे वेतन रखडले; मुख्यालयसमोर भीक मांगो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 09:54 PM2021-08-18T21:54:36+5:302021-08-18T21:55:20+5:30
चार महिन्यापासून रखडलेले वेतन मिळावे या मागणीसाठी संघटनेच्या वतीने पालिका मुख्ययलाय प्रवेशद्वारावर रिमझिम पावसात कामगारांच्या मागण्यासाठी भीक मांगो आंदोलन करून ठिय्या दिला.
भिवंडी- महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील वॉलमन, बोअरवेल, पाईपलाई निगा दुरुस्तीचे काम करणारे सुमारे ८४ हंगामी कामगारांचे ४ महिन्याचे वेतन रखडले आहे. थकीत वेतन कामगारांना मिळावे यासाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी कामगारांनी महापालिकासमोर ठिय्या मांडून भीक मांगो आंदोलन केले.
या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व कामगारांना पगारांची वेतन स्लिप तात्काळ द्यावी, कामगारांचा भविष्य निर्वा निधी व किमान वेतनाचा फरक तात्काळ द्यावा, तसेच या कामगारांना बोनस देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या असून मागील दोन वर्षांपासून श्रमजीवी संघटनेची कामगार संघ या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत. विशेष म्हणजे भिवंडी महापालिकेत पाणी पुरवठा वॉलमन , बोअरवेल, पाईपलाई निगा दुरुस्ती विभागात काम करणारे ८४ हंगामी कामगार हे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडत असून कोरोना काळात सर्व सामान्य कामगार मजूर वर्ग हातास काम नसल्याने मेटाकुटीला आला आहे.
चार महिन्यापासून रखडलेले वेतन मिळावे या मागणीसाठी संघटनेच्या वतीने पालिका मुख्ययलाय प्रवेशद्वारावर रिमझिम पावसात कामगारांच्या मागण्यासाठी भीक मांगो आंदोलन करून ठिय्या दिला. तब्बल पाच तास हे आंदोलन सुरू होते. अखेर, आयुक्त यांच्या अनुपस्थितीत मुख्यालय उपायुक्त दीपक पुजारी यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करून सायंकाळी आंदोलन स्थगित केले.