महसूलच्या तहसिलदारांसह नायबतहसीलदार -कर्मचा-यांचे मंगळवारपासून काम बंद;असहकार आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 02:16 PM2017-10-09T14:16:12+5:302017-10-09T14:16:26+5:30
महसूल विभागाच्या तहसिलदारांसह नायबतहसीलदार, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी मंगळवार - १० आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडणार आहेत.
ठाणे - महसूल विभागाच्या तहसीलदारांसह नायबतहसीलदार, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी मंगळवार - १० आॅक्टोंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडणार आहेत. या असहकार आदोलनात कोकण विभागासह राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील सुमारे ३० हजार अधिकारी - कर्मचारी सहभागी होणार आहेत. कार्यालयात उपस्थित राहणार पण प्रशासकीय कोणतेही काम या आंदोलनादरम्यान केले जाणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष भास्कर गव्हाळे यांनी लोकमतला सांगितले.
आधीच राज्यभरातील पुरवठा कर्मचा-यांनी सात दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासह प्रलंबित असलेल्या आवश्यक मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन छेडणार आहेत. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व प्रत्येक तहसिलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मंगळवारी कार्यालयात येतील मात्र ते कोणतेही काम करणार नाहीत. कार्यालयीन वेळेत ते कार्यालयात राहणार आहेत. या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय कामास हात लावणार नसून पूर्णपणे असहकारचा प्रवित्रा घेणार असल्याचे गव्हाळे यांनी सांगितले.