पडताळणी न करता नेमले जातात कामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:15 AM2020-06-08T00:15:27+5:302020-06-08T00:15:34+5:30

दुहेरी हत्याकांडावरून उघड : सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Workers are appointed without verification | पडताळणी न करता नेमले जातात कामगार

पडताळणी न करता नेमले जातात कामगार

googlenewsNext

मीरा रोड : मीरा रोडच्या बारमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी बार मालकाने गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या कर्मचाऱ्याची कोणतीच पोलीस पडताळणी केली नव्हती तसेच त्याची माहितीही नसल्याचे उघड झाले आहे . त्यामुळे शहरातील अनेक बार - लॉज, व्यवसायासह गृहनिर्माण संस्था तसेच अन्य ठिकाणी कर्मचारी नेमताना पडताळणी केली जात नसल्याने सुरक्षितेतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शीतल नगरच्या एटीएनएल मार्गावर शबरी बारमध्ये राहणारा व्यवस्थापक हरेश शेट्टी (४८) हा लॉकडाऊन काळात स्वत: चांगले पदार्थ खायचा पण कर्मचारी कल्लू यादव (३५) याला मात्र साधा डाळभात द्यायचा. कल्लूने पैसे मागूनही तो देत नसे. यातून दोघांमध्ये भांडण होऊन शेट्टी व सफाई कामगार नरेश पंडित (५२) ने कल्लूला मारहाण केली. त्याचा बदला घेण्यासाठी १ जून रोजी सर्व दारू पिऊन झोपल्यानंतर कल्लूने फावड्याने वार करून दोघांची हत्या केली व मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून पळून गेला.
पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली. १० जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. परंतु हत्या केल्याचे ५ जून रोजी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कल्लूची माहिती बार मालक गंगाधर पय्याडे यांच्याकडे विचारली असता त्यांच्याकडे नोकरनामा पासून त्याची कुठलीच माहिती नव्हती. कल्लू हा बारमध्ये जानेवारी पासून कामाला होता. त्या आधी काही महिने तो मीरा रोडच्याच दुसºया एका बारमध्ये काम करत होता अशी माहिती समोर आली आहे.
कल्लूवर कोलकत्ता येथे दोन सुरक्षारक्षकांच्या हत्येचा तर पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात मारामारी व दारूबंदीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून सातत्याने भाडेकरू ठेवण्यासह कर्मचारीही कामास ठेवताना पोलीस पडताळणी करून घेणे बंधनकारक असल्याचे सातत्याने आवाहन केले जाते. परंतु सर्रास पडताळणी करून घेतली जात नाही. नोकरनामाही ठेवला जात नाही. अनेक तर कोणतेच ओळखपत्र वा फोटोही घेत नाहीत.

माहिती घेतल्यावर कामावर ठेवा -राठोड
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनीही कामावर ठेवण्याआधी कार्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करून घ्या तसेच नोकरनामा आदी कायदेशीर बाबी पूर्ण करा व मगच कामावर ठेवा, असे आवाहन केले आहे. पण त्यासोबत पोलीस व कामगार विभागानेही कर्मचाºयांची पडताळणी न करून घेणाºयांविरोधात ठोस कायदेशीर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Workers are appointed without verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.