कामगारांच्या बसला अपघात; १७ जण झाले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 01:02 AM2020-10-06T01:02:41+5:302020-10-06T01:02:45+5:30
भिवंडीनजीकची दुर्घटना
भिवंडी : रात्रपाळीसाठी कामगारांना अॅमेझॉन कंपनीत कामावर घेऊन जाणाऱ्या भरधाव खाजगी बसने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने बसमधील १७ कामगार जखमी झाल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील सरवली गावाच्या हद्दीत रविवारी रात्री घडली. यामध्ये १० जण किरकोळ जखमी झाले. त्यांना प्रथमोपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर सात जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तालुक्यातील वडपे येथे असलेल्या अमेझॉनच्या गोदामातील हे कामगार असून, कामावर येण्याजाण्यासाठी त्यांना खाजगी बससेवा पुरवली जाते. रविवारी रात्रपाळीत काम करण्यासाठी भिवंडी शहरातील जुना जकातनाका येथून कामगारांना घेऊन रात्री ९ वाजता खाजगी बस निघाली.
मुंबई-नाशिक महामार्गावरील सरवली येथे बसचालकास रस्त्यात उभा असलेला कंटेनर दिसला नाही. त्यामुळे झालेल्या अपघातात १७ कामगारांच्या डोक्याला, छातीला, चेहºयाला मार लागला आहे. सर्व जखमी कामगारांना टेमघर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील सात जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले आहे.
मुदतबाह्य बसकडे दुर्लक्ष : भिवंडी शहरातून दररोज सुमारे ५० हून अधिक खाजगी बस कामगारांची ने-आण करत आहेत. या बसमध्ये अनेक बस मुदतबाह्य झाल्या आहेत. तसेच प्रशिक्षित चालकही नसून बसमध्ये अधिक संख्येने कामगार बसवून प्रवास केला जात आहे. मात्र, स्थानिक वाहतूक पोलीस व ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.