कामगारांची तपासणी सुरू; पाच दिवसांत पूर्ण करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:01 AM2020-07-21T00:01:30+5:302020-07-21T06:33:40+5:30
भिवंडीतील गोदामांमध्ये भिवंडी, कल्याण, ठाणे, डोंबिवली ,मुंबई, शहापूर, वाडा आदी परिसरांतून लाखो कामगार कामासाठी येतात.
भिवंडी : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडीतील ग्रामीण भागात असलेल्या गोदामपट्ट्यांतील कामगार आणि कर्मचाऱ्यांची सोमवारपासून आरोग्यतपासणी सुरू करण्यात आली आहे. थर्मोमीटरद्वारे ताप आणि आॅक्सिमीटरने रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण तपासले जात आहे. पाच दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिले आहेत.
ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भिवंडी प्रांत कार्यालयात १० जुलैला तालुका आणि जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाºयांच्या उपस्थितीत तातडीची बैठक बोलावली होती. ग्रामीण भागातील ४० ग्रामपंचायतींच्या हद्दीतील २५ हजार गोदामांतील सुमारे पाच लाख कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तसेच, कोरोनाचा रुग्ण आढळल्यास गोदाम तत्काळ बंद करण्याचेही आदेश दिले.
भिवंडीतील गोदामांमध्ये भिवंडी, कल्याण, ठाणे, डोंबिवली ,मुंबई, शहापूर, वाडा आदी परिसरांतून लाखो कामगार कामासाठी येतात. भिवंडीतील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाला आवर घालण्यासाठी ही तपासणी मोहीम उघडण्यात आली आहे. जे गोदामधारक कामगारांच्या आरोग्यतपासणीकामी सहकार्य करणार नाहीत आणि कोविड-१९ च्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांचे गोदाम सील करण्यात यावे. तसेच हे तपासणीचे काम २४ जुलैपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना डॉ. नळदकर यांनी सर्व नियुक्त गटांना दिल्या आहेत.
कोरोनाची धास्ती : भिवंडी शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोदामे आहेत. याठिकाणी विविध ठिकाणांहून कामगार रोजगारासाठी येत असतात. त्यांच्यामार्फत कोरोना फैलावण्याचा धोका असल्याने ही उपाययोजना केली आहे.
अशी आहे रचना
मोहिमेसाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायतींचे कर्मचारी, महसूल विभागाचे तलाठी, जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक, कृषी सहायक तसेच भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी यांचे ८३ गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात तीन ते चार कर्मचारी तपासणीसाठी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक पाच गटांसाठी एक पर्यवेक्षण अधिकारी आणि १५ गटांसाठी एक नियंत्रण अधिकारी अशी रचना उपविभागीय अधिकारी डॉ. नळदकर यांच्या आदेशाने केली आहे.