कल्याण तहसील कार्यालयावर श्रमजीवींचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 03:17 AM2018-08-07T03:17:43+5:302018-08-07T03:17:59+5:30
आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने सोमवारी कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
कल्याण : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने सोमवारी कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार अमित सानप यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. येत्या आठवडाभरात मागण्यांसंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे, असे आश्वासन सानप यांनी मोर्चाला दिले आहे.
श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात नीरा जाधव, विष्णू वाघे, गणेश भामरे, नंदू जाधव, कोंडू मुकणे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कल्याण तालुक्यातील टिटवाळ्यातील गणेशवाडी, उतणे कातकरीपाडा, राया कलमवाडी, कोलम कातकरीपाडा, फळेगाव कातरीपाडा, वाहोली कातकरीपाडा, नडगाव, खाकरवाडी, कोम्याचीवाडी, पळसोली वैतागवाडी, वरप कातकरीवाडी या भागांमध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. तेथील रहिवाशांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा होत नाही. आदिवासींना हक्काची घरे दिलेली नाहीत. लहान मुलांचा कुपोषणाने मृत्यू होत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकेवरील आदिवासीधारकाला ३५ किलो अन्नधान्य दिले पाहिजे. ते दिले जात नाही. त्याचा काळाबाजार केला जात आहे. आदिवासीपाड्यात विजेची व्यवस्था नाही. स्वतंत्र स्मशानभूमी नाही. अंगणवाड्यांची व्यवस्था नाही. स्तनदा व गरोदर मातांना आरोग्याची सुविधा नाही. ठाकरपाडा, मठाचीवाडी, चौरा, कोलम, दहिवलीवाडी, कोसले, काकडपाडा, गेरसा, ओझर्ली आदी २६ पाड्यांवर मुख्य रस्त्याला जोडणारे अंतर्गत रस्ते तयार केलेले नाहीत. आदिवासींच्या कब्जेवहिवाटीवरील जागेवर चुकीचे शेरे मारले आहेत. ते दुरुस्त केले जावेत, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.