कामगारांचे बेमुदत उपोषण
By admin | Published: November 8, 2016 02:15 AM2016-11-08T02:15:58+5:302016-11-08T02:15:58+5:30
महापालिकेच्या सफाई कामगार व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या असहकार आंदोलनाकडे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने
भिवंडी : महापालिकेच्या सफाई कामगार व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या असहकार आंदोलनाकडे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने कामगारांनी सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन कामगारांना दिले.
पालिका अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीप्रमाणे कामगारांच्या पगाराची तजवीज करण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पार न पाडल्याने कामगारांची दिवाळी अंधारात गेली. मागील महिन्याचे वेतन व दिवाळीचे सानुग्रह अनुदान न मिळाल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. कायदे धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांचे काम सुरू असल्याने भ्रष्ट कारभार वाढला आहे. जो अधिकारी अधिक भ्रष्टाचार करतो त्याला मोठे पद दिले जाते. त्यामुळे महापालिका आर्थिक दिवाळखोरीत जाऊन आज कामगारांना पगार देता येत नाही अशी पालिकेची स्थिती झाली आहे, असा आरोप कामगारांनी केला आहे. तर कामगारांच्या विमापॉलिसी व पीएफच्या रकमेत घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्त कारवाई करीत नाही असाही आरोप करण्यात आला.
पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे व महापौर तुषार चौधरी यांच्यात संवाद व समन्वय नसल्याने कामगारांवर ही वेळ आली असून या सर्व मागण्यांसाठी मुख्यालयासमोर भिवंडी महापालिका कामगार-कर्मचारी संघर्ष कृती समितीतर्फे हजारो कामगारांनी ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाच्या ठिकाणी शहरातील एकही आमदार न आल्याने समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांच्या मागण्यांसाठी त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सरकारचे अनुदान मिळाल्यानंतर कामगारांचे पगार देण्याचे आश्वासन दिले.
कामगारांचे पगार लवकर व्हावे यासाठी भिवंडी पालिकेस अनुदान मिळावे या मागणीसाठी आझमी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत,असे त्यांनी उपोषण कर्त्यांना सांगितले.
(प्रतिनीधी)