विवेक पंडितांच्या सुटकेसाठी श्रमजीवीचा ठिय्या
By admin | Published: May 2, 2017 02:53 AM2017-05-02T02:53:13+5:302017-05-02T02:53:13+5:30
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व माजी आमदार विवेक पंडित यांच्यासह ११ महिला आणि ३६ कार्यकर्त्यांवर असभ्य
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व माजी आमदार विवेक पंडित यांच्यासह ११ महिला
आणि ३६ कार्यकर्त्यांवर असभ्य वर्तनाच्या आरोपाखाली पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निधी चौधरी यांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे येथील मध्यवर्ती कारागृहात असलेले पंडित व त्यांच्या कार्यकर्त्यांना त्वरित सोडण्यात यावे आणि सीईओंवर कारवाई करावी, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पालघर जिल्ह्यात सुमारे ६०० कुपोषित बालकांचा मागील वर्षी मृत्यू झाला आहे. तर ८०० बालके कुपोषणाने पिडीत असून मृत्युच्या उंबरठ्यावर आहे. या बालकांचे मृत्यू टाळणाऱ्या अंगणवाडी केंद्रांच्या समस्या, सेविका, मदतनीस, कुपोषण निर्मुलन आदी मागण्यांसाठी पालघर जिल्हा ंपरिषदेवर ‘सरकारचे डोहाळे जेवण’ या नावे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळास लेखी आश्वासन देणाऱ्या सीईओंनी दुसऱ्या दिवशी असभ्यतेच्या आरोपाखाली खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आणि ठाण्यासह पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत ठिय्या आदोलन सुरू केले आहे.
या खोट्या गुन्ह्याखाली पंडित यांच्यासह ११ महिला आणि ३६ कार्यकर्ते ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. यामुळे हा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या सीईओंवर कडक कारवाई करावी, पंडित यांच्यासह कार्यकर्त्यांना बिनशर्त सोडवण्यात यावे या मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा विद्युल्लता पंडित, सरचिटणीस बाळाराम भोईर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहो.
दरम्यान महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामुळे त्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट होऊ शकती नाही. यानंतर शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त डी. एस. स्वामी यांची भेट घेतली. षडयंत्र रचून कार्यकर्त्यांवर लोकशाहीत असे खोटे गुन्हे सरकारी अधिकारी दाखल करीत असतील तर आदिवासी, गोरगरीब जनतेची गाऱ्हाणी आम्ही कोणाकडे मांडावी, अशी कैफियत त्यांनी मांडली. संबंधित सीईओंवर कारवाईची मागणी या शिष्टमंडळाने केली.