ठाणे, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवींची धडक, सरकारविरोधात दोन्ही जिल्ह्यांत भव्य मोर्चे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 07:01 PM2017-11-15T19:01:23+5:302017-11-15T19:01:45+5:30
ठाणे/ पालघर- निराधार, आदिम आणि दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या अंत्योदय लाभार्थ्यांपैकी दोनपेक्षा कमी लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या शासनाच्या तुघलकी आदेशाविरोधात आज श्रमजीवी संघटनेने ठाणे व पालघर जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले.
ठाणे/ पालघर- निराधार, आदिम आणि दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या अंत्योदय लाभार्थ्यांपैकी दोनपेक्षा कमी लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या शासनाच्या तुघलकी आदेशाविरोधात आज श्रमजीवी संघटनेने ठाणे व पालघर जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले. दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज भव्य मोर्चा काढून श्रमजीवीच्या हजारो कष्टकरी बांधवांनी गरीबांच्या तोंडचा घास पळविणा-या शासनाचा आणि प्रशासनाचा तीव्र निषेध केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. हे अन्यायकारक पत्र शासनाने मागे घेतले नाही तर श्रमजीवी तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.
पालघर जिल्ह्यात - १३४५४, ठाणे -१०३००, रायगड -१४३००, नाशिक - ८००० याप्रमाणे केवळ या चार जिल्ह्यांमध्येच असे सुमारे ४६०५४ गरीब आदिवासी , कातकरी , अंत्योदय योजनेचे लाभार्थी ना अंत्योदय योजनेतून कमी करून त्यांना मिळणारे ३५ किलो धान्य कमी करून त्यांना अन्न सुरक्षेच्या प्राधान्य यादीत समाविष्ट करण्याचे आदेश 21 सप्टेंबर 2017 रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी एका पत्राद्वारे दिले. हे सर्व लाभार्थी अन्न सुरक्षेच्या प्राधान्य यादीत घेऊन त्यांना महिन्याला प्रति व्यक्ती केवळ ५ किलो धान्य या आदेशानुसार यापुढे दिले जाईल असा हा निर्णय आहे. मुळात 2013 साली जेव्हा अन्न सुरक्षा कायदा झाला तेव्हा अंत्योदय या 2001 सालीच्या अंत्योदय योजनेला या कायद्याने कोणतीही बाधा अली नव्हती. त्यामुळे प्राधान्य कुटुंबाना प्रति व्यक्ती पाच किलो तर अंत्योदय लाभार्थ्यांना35 किलो धान्य मिळण्याची तरतूद आहे. प्रधान सचिवांनी जारी केलेल्या या पत्रामुळे अंत्योदय लाभार्थ्यांच्या तोंडचा घास पाठविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. या प्रश्नावर महिन्याभरापूर्वी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार केला होता.
आज याबाबत संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे सरकारला चांगलीच धडक देण्यात श्रमजीवी संघटनेला यश आले. ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात सुमारे आठ ते दहा हजार सभासद महिला पुरुष सहभागी झाले होते, यावेळी सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, उपाध्यक्ष अशोक सापटे, प्रमोद पवार, राजेश चन्ने, दशरथ भालके, किसन चौरे, सुनील लोणे, जया पारधी, संगीता भोमटे, नंदा वाघे इत्यादी कार्यकर्ते नेतृत्व करत होते,
तर पालघर मध्ये देखील या मोर्चाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद होता दहा हजारपेक्षा जास्त लोक पालघर जिल्ह्याच्या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष केशव नानकर, उपाध्यक्ष रामभाऊ वारणा, सहसरचिटणीस विजय जाधव, जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, ज्ञानेश्वर शिर्के,उल्हास भानुशाली यांसह जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होते. यावेळी उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे यांना निवेदन सादर करण्यात आले. ठाण्यातील एक नामांकित वकील प्रदीप टिल्लू यांनी या मोर्चाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शिस्तीचे धडे देणाऱ्या कष्टकऱ्यांच्या मोर्चा, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
ऍड. टिल्लू म्हणाले की गेली अनेक वर्षे श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांचे मोर्चे निघतात. मात्र जराही बेशिस्त आढळत नाही, कुणालाही त्रास न देता हे कष्टकरी श्रमजीवी बांधव आपल्या भावना सरकारकडे पोहोचविण्यासाठी येत असतात हे कौतुकास्पद आहे. आज ठाणे पालघर प्रमाणे रायगड आणि नाशिक जिल्ह्यातही श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून अंत्योदयबाबत घेतलेला अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी असणारे निवेदन सादर केले.