जागतिक जैवविविधता दिन : ठाण्यातील जैवविविधतेवर शासनाचाच डंख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:36 AM2020-05-22T00:36:10+5:302020-05-22T00:36:31+5:30
धक्कादायक म्हणजे गोरेगाव-मुलुंड रस्त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ४.७ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदणार आहेत. शिवाय, एमएमआरडीएचा याच उद्यानातून ठाणे ते बोरिवलीदरम्यान केबल ट्रान्सपोर्टचा इरादा आहे.
ठाणे : सागरी-डोंगरी अन् नागरी अशा तीन विविधतांत नटलेल्या ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. संजय गांधी उद्यानाचा भाग असलेले येऊरचे जंगल, ठाणे खाडी परिसरात असलेल्या फलेमिंगो अभयारण्यासह तानसाच्या पक्षी अभयारण्याचे सौंदर्य लाभले आहे. मात्र, या सौंदर्यास वृक्षतोड करणाऱ्या माफियांसह विकासाच्या नावाखाली दस्तुरखुद्द स्थानिक स्वराज्य संस्थांसह महाराष्ट्र आणि केंद्र शासनानेच डंख मारला आहे. यामुळे या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याची गरज आहे.
धक्कादायक म्हणजे गोरेगाव-मुलुंड रस्त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ४.७ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदणार आहेत. शिवाय, एमएमआरडीएचा याच उद्यानातून ठाणे ते बोरिवलीदरम्यान केबल ट्रान्सपोर्टचा इरादा आहे. तसेच ठाणे ते बोरिवलीदरम्यानचे रस्ता वाहतुकीचे अंतर कमी व्हावे, म्हणून रस्ते विकास महामंडळाने याच उद्यानातून ११ किमी लांब असा सहापदरी बोगदा खोदण्याचा निर्णय घेतला आहे. गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड मेट्रोचा सुमारे १.२ किमी मार्गही याच उद्यानातून जाणार आहे. यामुळे या उद्यानासह येऊरला धोका पोहोचून बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांवर संकट येणार आहे.
ठाणे-वाशी खाडीचा परिसर फलेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केला असला तरी येथूनच बुलेट ट्रेन, वाशी येथील नवा खाडीपूल आणि न्हावाशेवा सी-लिंकचे बांधकाम होत आहे. शिवाय, वॉटर ट्रान्सपोर्टसाठीदेखील तिवरांची कत्तल होत असताना तिकडे ठाणे महापालिकेनेही १३ ठिकाणी खाडीकिनारा विकासाच्या नावाखाली जैवविविधतेचा गळा घोटल्याने फलेमिंगोवर नवी जागा शोधण्याची पाळी आली आहे.
जैवविविधतेने समृद्ध ठाणे
समृद्धी मार्गासह काळू, शाई, गारगाई, पिंजार धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात वृक्षकत्तल करण्यात येत असून भविष्यात आणखी ती होणार आहे. कल्याण-ठाणे-कोलशेत-गायमुख-भार्इंदर-वसई, मुंबई-नवी मुंबई-रायगड-मालवण असे प्रवासी जलवाहतुकीकरिता रो-रो सेवेचे प्रस्ताव आहेत.
सद्य:स्थितीत कल्याण, वसई, मीरा-भार्इंदर, घोडबंदर रोड, भिवंडी, कोलशेत, दिवा, ठाणे, नेरूळ, बेलापूर, वाशी, गोराई, बोरिवली, वसई व भार्इंदर रो-रो वाहतूक प्रस्तावित असून त्यास केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत मान्यता मिळाली आहे.
यासाठी मोठ्या प्रमाणात खारफुटी तोडून भराव सुरू आहे. ठाणे शहरातच १३ ठिकाणी वॉटरफ्रंटच्या नावाखाली निसर्गावर अत्याचार केला आहे.
सध्या एमएमआरडीए क्षेत्रात बिल्डरच नव्हे त शासनाने विविध विकास प्रकल्पांद्वारे निसर्गावर घाला घातला आहे. कुठे डोंगर पोखरला जात आहे, कुठे नद्यांमध्ये भराव टाकून त्यांचे प्रवाह बदलले जात आहे. विमानतळ, सी-लिंक साठी खारफुटीची कत्तल केली जात आहे. मँग्रोज सेल शासनाच्या नियमांचे पालन करीत नाही. निसर्गाला त्याच्याप्रमाणे जगू द्या, अशी आमची मागणी आहे.
- बी.एन. कुमार संचालक,
नॅट कनेक्ट फ्रंट