येत्या रविवारी ठाण्यात साजरा होणार जागतिक हास्य दिन, २५० हास्यप्रेमी येणार एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:51 PM2018-05-03T16:51:33+5:302018-05-03T16:51:33+5:30
ठाण्यातील हास्य योग क्लब २०१४ पासुन जागतिक हास्य योग दिवस साजरा करीत आहेत. या वर्षी येत्या रविवारी हा पाचवा जागतिक हास्य योग दिवस साजरा होत आहे.
ठाणे: विविध हास्यांचे प्रकार सादर करुन नाच, गाणी आणि खेळासह ठाण्यात येत्या रविवारी जागतिक हास्य योग दिन साजरा केला जाणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. यावेळेस रविवार ६ मे रोजी कचराळी तलाव येथे सकाळी ७ ते ९.३० या वेळेत हा दिवस साजरा केला जाणार आहे.
हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारीया व सहसंस्थापक माधुरी कटारिया यांनी जगातील १०६ देशांत हास्ययोगाचा प्रसार केला. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, ईचलकंरजी, सोलापूर, नगर, औरंगाबाद, लातूर, नागपूर, चंद्रपूर, जळगाव, कर्जत, पेण, पनवेल अशा अनेक ठिकाणी हास्य क्लब आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांत हास्य योगच्या कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देणे, हास्य योगाचा प्रसार करणे ई. कार्यक्र म लाफ्टरयोग इंटरनॅशनलच्या माध्यमातून चालते. हास्य योग एक वैश्विक भाषा आहे जी सर्व हास्य प्रेमी बोलतात. वेगवेगळ्या देशातील व संस्कृतीचे लोक हास्य योगचळवळी मुळे जवळ येत आहेत आणि त्यामुळे एक जागतिक विस्तारित कुटूंब निर्माण झाले आहे असे ठाण्यातील क्लबचे हास्यप्रेमी सांगतात. आम्ही आनंदी आहोत म्हणून हासत नाही तर आम्ही हासतो म्हणून आनंदी आहोत हे हास्यप्रेमींचे घोषवाक्य आहे. ठाण्यातील सर्व हास्य योग क्लब एकत्र येऊन येत्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा करित आहेत. दोस्ती विहार हास्य योग क्लब व सिद्धी विनायक हास्य योग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. यात डॉ.मदन कटारीया यांच्या संदेशाचे वाचन केले जाणार आहे. ठाण्यातील हास्य योग प्रणेते डॉ. माधव म्हस्के मार्गदर्शन करतील. वेगवेगळे हास्य योग क्लब गाणी, नृत्य, हास्य प्रकार ईत्यादी सादर करतील. जर तुम्ही हसाल तर तुम्ही बदलाल. तुम्ही बदललात तर जग बदलेल, दर रोज हसा व निरोगी असा हा संदेश यावेळी दिला जाणार आहे. जवळपास २५० हास्यप्रेमी यात सहभागी होतील.