विद्यार्थी रमले पक्ष्यांच्या दुनियेत, "पक्षांची माहिती कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 04:47 PM2019-07-20T16:47:55+5:302019-07-20T16:52:17+5:30
शालेय विषयार्थ्यांसाठी पक्षांची माहिती या विषयावर कार्यशाळा पार पडली.
ठाणे : शनिवारी सकाळी शालेय विद्यार्थी पक्ष्यांच्या दुनियेत रमले होते. निमित्त होते पर्यावरण दक्षता मंडळाच्या पर्यावरण शाळा आयोजित पक्षांची माहिती या कार्यशाळेचे. शनिवारी सकाळी ठाण्यातील लक्ष्मीबाई विद्यामंदिर आणि हॅपी होमी विद्यालय येथे विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल जागृती निर्माण व्हावी म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
दोन्ही शाळांच्या मिळून सुमारे १०० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेसाठी आपली उपस्थिती दर्शवली. पर्यावरण अभ्यासक चित्रा म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांना पक्षी म्हणजे काय ? तसेच त्यांचे वैशिष्टय विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सुरवातीला पक्षांचे पुराणात असणारे स्थान, पक्षांबद्दलच्या पंचतंत्रातील गोष्टी सांगून त्यांनी मुलांमध्ये पक्षांबद्दल कुतूहल निर्माण केले. त्यानंतर पक्षांची शारीरिक संरचना, त्यांचे विविध गुणधर्म, त्यांच्या गुढग्यांचे गुपित अशा विविध रंजक गोष्टींमधून त्यांची उत्कंठता वाढवली. स्थानिक पक्षी तसेच स्थलांतरित पक्षांचीही माहिती याकार्यशाळेत सांगितली गेली बीजप्रसार,परागीभव तसेच किटकनाशणासाठी पक्षांचे असलेले महत्व यामाध्यमातून विशद करण्यात आले. पक्षांच्या घरट्यांचे वैशिष्टय सांगताना त्यांच्या झाडावरील झोपण्याच्या कसबाबद्दल तसेच पक्षांच्या तीनही प्रकारच्या आंघोळींबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पक्षीनिरीक्षण करताना कोणकोणत्या सोप्या पद्धती वापराव्यात तसेच कोणती काळजी घ्यावी याबद्दल चित्रा यांनी मार्गर्शन केले. तसेच घरच्या घरी वाया गेलेल्या गोष्टींपासून आपण कशा पद्धतीने बर्ड फीडर बनवू शकतो याबद्दलची माहिती देखील सांगितली गेली. समस्त पक्षीनिरीक्षकांचे आधारस्तंभ आणि आद्य गुरु असलेले डॉ. सलीम अली यांच्या ३२ व्या पुण्यतिथीला आजच एक महिना पूर्ण झाला त्यानिमित्ताने डॉ. सलीम अली यांचीदेखील माहिती चित्रा म्हस्के यांनी सांगितली गेली. विद्यार्थ्यांना दिलेल्या या माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये पक्षिनिरीक्षणाची गोडी निर्माण होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त केली गेली. तसेच आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण थोडा तरी वेळ पक्ष्यांसाठी राखून ठेवावा असे आवाहन चित्रा यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनीही त्यांना पक्षांसाठी दाणे तसेच पाणी ठेवण्याचे वचन दिले.