मयुरेशच्या मृत्यूच्या धसक्याने वडिलांनी सोडले जग
By admin | Published: May 26, 2017 12:36 AM2017-05-26T00:36:35+5:302017-05-26T00:40:21+5:30
डोंबिवलीच्या प्रोबेस कंपनीत गेल्यावर्षी झालेल्या स्फोटात कमावता मुलगा मयुरेश वायकोळे याचा मृत्यू झाला
मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवलीच्या प्रोबेस कंपनीत गेल्यावर्षी झालेल्या स्फोटात कमावता मुलगा मयुरेश वायकोळे याचा मृत्यू झाला... त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून वडील सावरले नाहीत. मुलाच्या जाण्याची जखम त्यांच्या मनात तशीच भळभळत राहिली. अवघ्या अकरा महिन्यांत वडील विजय यांनीही या जगाचा निरोप घेतला आणि मुलाच्या वर्षश्रद्धापूर्वीच वडिलांचे श्राद्घ करण्याची वेळ वायकोळे कुटुंबावर आली... हे सांगताना मुयरेशची आई मंदा यांचे डोळे पाण्याने डबडबले होते...
२६ मे २०१६ ला डोंबिवलीच्या प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले. प्रोबेस कंपनीत कामाला लागलेला मयुरेश हा ३० वर्षाचा तरुण कल्याण पश्चिमेतील आधारवाडी येथील भगीरथ संकुलातील गजानन इमारतीत राहत होता. कंपनीत त्याच्या कामाचा दुसराच दिवस होता. अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तो शिकला. अंबरनाथच्या सुपरमॅक्स कारखान्यात तो आधी कामाला होता. पणे तेथे पगार कमी मिळत असल्याने त्याने प्रोबेस कंपनीत काम शोधले. ठरल्याप्रमाणे मयुरेश कामावर गेला. सकाळी त्याच्या हातावर अॅसीड पडल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. ती माहिती त्याने फोन करुन घरी वडील विजय यांना दिली. या फोननंतर काही क्षणातच टीव्हीवर बातमी झळकली, की प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला...
या स्फोटात मुयरेश मरण पावला. हे तीन तासानंतर त्याच्या घरच्या मंडळींना कळाल्यावर कमावता मुलगा गेल्याची बातमी ऐकून मयुरेशची आई मंदा, वडील विजय यांच्यासह लहान भावाला मोठा धक्काच बसला. मुयरेशची आई मंदा या शिक्षिका होत्या. मुयरेश कामाला लागल्याने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याचे वडील विजय हे देखील शिक्षक होते. त्यांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. वायकोळे कुटुंबाची सारी भिस्त मुयरेश याच्यावर होती. मुयरेशलाही आई- वडिलांचा आधार व्हायचे होते. त्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या जाण्याच्या दु:खातून त्याची आई, वडील, भाऊ हे बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. पण मुलाच्या जाण्याचा चटका मयुरेशच्या वडिलांना बसला. त्या धक्क्यातून ते सावरू शकले नाहीत. तिथीनुसार मयुरेशचे वर्षश्राद्ध १५ एप्रिलला करण्याचे ठरले होते. त्यासाठी वडिलांनी नातेवाईकांना कळविले होते. सामानाची यादी तयार केली होती. पण ७ एप्रिलला त्यांना कसेतरी वाटू लागले. त्रास होऊ लागला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना झोपेतच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. उरली फक्त मुयरेशची आई मंदा आणि लहान भाऊ. वडील गेल्याने त्यांचेच दिवसकार्य करायचे असल्याने मुयरेशचे तिथीनुसार वर्षश्राद्धही करता आले नसल्याची खंत त्याच्या आईने व्यक्त केली.