जागतिक मूत्रपिंड दिनविशेष: भारतात दरवर्षी पडते दोन लाख रुग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 12:32 AM2019-03-15T00:32:00+5:302019-03-15T00:33:55+5:30
दिनेश महाजन यांची माहिती; डायलेसिस सेंटरची कमतरता, आजार टाळण्यासाठी जागृतीची गरज
डोंबिवली : मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये किडनी विकाराचे प्रमाण अधिक आहे. मधुमेह असलेल्या ७० टक्के रुग्णांना तर, उच्च रक्तदाब असलेल्या २० टक्के लोकांना किडनीचे विकार होतात. भारतात दरवर्षी दोन लाख किडनीच्या रुग्णांची भर पडत आहे. मात्र, त्यांच्या तुलनेत डायलेसिस सेंटरची संख्या कमी आहे. किडनीचे विकार वाढत असताना मुळातच हा रोग होऊ नये, याकरिता जागृतीची गरज आहे, असे मत मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. दिनेश महाजन यांनी व्यक्त केले.
जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमित्ताने गुरुवारी डोंबिवली पत्रकार संघातर्फे डॉ. महाजन यांचा ‘तरुण वयातील किडनी विकार आणि त्यापासून बचाव’ या विषयावर वार्तालाप झाला. यावेळी ते बोलत होते. डॉ. महाजन म्हणाले, डोंबिवली शहरात डायलेसिस सेंटरची संख्या कमी आहे. किडनीने आपले कार्य करणे बंद केले की, त्यावर कोणताही उपचार नाही. किडनीरोग वाढू नये, याकरिता उपचार केले जातात. काही अल्प प्रमाणात अनुवांशिक रुग्ण दिसून येत आहे. भारतात किडनी रुग्णांचे १७ टक्के प्रमाण आहे. ३० ते ३५ वयोगटांतील तरुणांना या आजाराने ग्रासले आहे.
आजार टाळण्यासाठी विविध तपासण्या आणि औषधे घेण्याकडे दुर्लक्ष न करता आहार, विहार आणि व्यायाम आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करावी, असा सल्ला डॉ. महाजन यांनी दिला. किडनी या रोगावरील उपचार अत्यंत खर्चिक आहेत. त्यामुळे हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्यासाठी पायाभूत आरोग्यसुविधा उभ्या करणे सरकारी पातळीवरही शक्य नाही. त्यामुळे हा आजार होऊ न देणे, याची काळजी सर्वांनी घेण्याची गरज आहे. हिमोग्लोबिनची कमतरता, लघवीला फेस येणे, जेवण कमी जाणे, उलटी आदी प्राथमिक लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात.
एक किडनी खराब झाल्यास एका किडनीवर व्यक्ती व्यवस्थित आयुष्य जगू शकते. दुसरी किडनी तो भार उचलत असते. केवळ आई, वडील, भाऊ, बहीण आणि बे्रनडेड व्यक्तीच किडनी दान करून शकते. मात्र, किडनी रुग्णांची प्रतीक्षायादी आहे. एखाद्या रुग्णाला चार ते पाच वर्षे किडनीदात्याची वाट पाहावी लागते. दोन्ही किडन्या खराब झाल्यास रुग्णाला डायलेसिस करावे लागते. या पद्धतीबाबत समाजात चुकीची माहिती आहे, असे त्यांनी सांगितले.
आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्याल
किडनीचा आजार टाळण्यासाठी जास्तीतजास्त पाणी प्यावे. मिठाचा वापर आहारात कमी करावा. तेलाचे प्रमाणही नियंत्रणात असले पाहिजे. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
मांसाहारी जेवण आठवड्यातून एकदाच घ्यावे. मद्यपान करू नये. लठ्ठपणा कमी करावा. मधुमेही रुग्णांनी सहा महिन्यांतून आणि सामान्य नागरिकांनी वर्षातून एकदा तपासणी करावी, असा सल्लाही महाजन यांनी दिला.
कृत्रिम किडनीसाठी संशोधन सुरू
किडनी खराब झाल्यास त्यावर उपचार करता यावे, याकरिता अमेरिका आणि युरोप या प्रगत देशांत संशोधन सुरू आहे. थ्रीडी प्रिंटिंग आणि कृत्रिम किडनी तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, येत्या पाच वर्षांत तरी हे संशोधन पूर्णत्वास येण्याची शक्यता नाही. त्याला आणखी जास्त कालावधी लागेल. पण, हे संशोधन यशस्वी झाल्यास किडनी रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होईल, असे डॉ. महाजन यांनी सांगितले.