जागतिक यकृत दिन - १९ एप्रिल -  भारत जगातील सर्वाधिक यकृत रोग मृत्यू नोंदवणारा देश 

By धीरज परब | Updated: April 19, 2025 15:22 IST2025-04-19T15:22:10+5:302025-04-19T15:22:27+5:30

भारतात दरवर्षी सुमारे २ लाख ६८ हजार ५८० लोकांचा मृत्यू यकृत रोगामुळे! 

World Liver Day 19 April India records the highest number of liver disease deaths in the world | जागतिक यकृत दिन - १९ एप्रिल -  भारत जगातील सर्वाधिक यकृत रोग मृत्यू नोंदवणारा देश 

जागतिक यकृत दिन - १९ एप्रिल -  भारत जगातील सर्वाधिक यकृत रोग मृत्यू नोंदवणारा देश 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- भारतात यकृत संबंधित आजार व त्याने होणारे मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात दरवर्षी सुमारे २ लाख ६८ हजार ५८० लोकांचा मृत्यू यकृत रोगामुळे होतो. जगभरात यकृत रोगां मुळे मृत्यू होण्याच्या तुलनेत  १८.३% मृत्यू एकट्या भारतात होतात. त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक यकृत रोग मृत्यू नोंदवणारा देश ठरतो. देशातील एकूण मृत्यूं पैकी ३.१७% इतके प्रमाण यकृत रोगांच्या कारणांनी आहे. 

यकृताचे महत्त्व, यकृत रोग टाळण्यासाठी उपाय आणि जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १९ एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात यकृतसंबंधित मृत्यू वाढत असताना, आहाराच्या माध्यमातून प्रतिबंधक उपाय योजणे ही काळाची गरज झाली आहे.

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. आदित्य वर्मा म्हणाले कि, “भारत  गंभीर यकृत रोगाच्या महामारीला सामोरे जात आहे, आणि त्यामागे आहार हेच मुख्य  प्रमुख कारण आहे. रोजचे जेवण आपले यकृत बिघडवू शकते किंवा ते सुधारू शकते. आज धकाधकीच्या जीवनात शहरातील नागरिक झटपट खंमग पदार्थ खाण्याच्या आहारी गेला आहे.  तिखट व तेलकट पदार्थांचा समावेश वाढल्याने पोटाचे आरोग्य बिघडून त्याचा दुष्परिणाम यकृतावर होत असतो. 

मुख्य म्हणजे यकृत बिघडल्याची लाक्षाने शेवटच्या टप्य्यात समजून येतात व त्यावेळी यकृत हे पूर्णपणे खराब झालेले असते. भारतात यकृत रोग होण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे फॅटी लिव्हर (चरबीयुक्त यकृत), हेपेटायटीस संसर्ग, मद्यपानामुळे होणारे यकृताचे नुकसान आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे मेटाबोलिक विकार. त्यात भर म्हणून, प्रक्रियायुक्त अन्न, साखर व अपारंपरिक चरबी यांचा अतिरेक यकृतासाठी अत्यंत हानिकारक ठरतो.

 आहार हेच आपले पहिले आणि प्रभावी औषध आहे. संतुलित आणि पोषणयुक्त आहाराच्या माध्यमातून यकृत रोगांचा धोका कमी करता येतो. बर्‍याच प्रकरणांमध्ये सुरुवातीचे यकृताचे नुकसान भरूनही निघू शकते.  देशात यकृताचे वाढते रोग पाहता वैद्यकीय तज्ज्ञांनी लोकांना आहाराच्या माध्यमातून आरोग्यावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

पांढर्‍या पीठाचे पदार्थ, साखर आणि तळलेले पदार्थ कमी करणे. संपूर्ण धान्ये, भाज्या, फळे आणि कडधान्य यांचा समावेश करणे. सत्त्वयुक्त सेंद्रिय चरबींचा उदा. सुका मेवा, बिया, ऑलिव्ह तेल चा वापर करणे. भरपूर पाणी पिणे आणि मद्यपानाचे प्रमाण कमी करणे असा आहारविषयक सल्ला डॉ. आदित्य वर्मा यांनी दिला आहे.

Web Title: World Liver Day 19 April India records the highest number of liver disease deaths in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य