जागतिक नदी दिनविशेष, ठाणे जिल्ह्यातील नद्यांच्या आरोग्याची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:26 AM2020-09-27T00:26:41+5:302020-09-27T00:26:59+5:30
संडे अँकर। पर्यावरणतज्ज्ञांचे मत : मागील १५ ते २० वर्षांत झाला कोंडमारा
स्नेहा पावसकर ।
ठाणे : ठाणे जिल्ह्यात सुमारे १० नद्या असून त्या जिल्ह्यासह मुंबई शहराचीही तहान भागवतात. या नद्यांचा आपण पिण्याच्या पाण्यासाठी आणि एकूणच वापरासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. पण, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील नद्यांच्या आरोग्याची हेळसांड झाली आहे. त्या काही प्रमाणात दूषित झाल्या आहेत. औद्योगिक, रासायनिक प्रदूषणांमुळे मृतावस्थेत गेल्या आहेत. या नद्यांचे सौंदर्य राखायचे असेल आणि येत्या काळातील पाण्याचे दुर्भिक्ष टाळायचे असेल, तर नैसर्गिक संपत्ती असलेल्या नदीचे मानवाने संवर्धन केले पाहिजे. नदीप्रति असलेली आपली वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी ओळखून वर्तन ठेवले पाहिजे, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी रविवारी साजऱ्या होणाºया जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले.
नदी ही आपली माता आहे. तिच आपले खºया अर्थाने भरणपोषण करते. ठाणे जिल्ह्यात उल्हास, बारवी, भातसा, काळू, वालधुनी, भारंगी, शाई अशा अनेक नद्या-उपनद्या आहेत. जिल्ह्यात दरवर्षी मोठा पाऊस पडत असल्याने या नद्यांना पाणीही पुष्कळ असते. गेल्या काही वर्षांत सरासरी पाऊस कमी झाल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई जाणवते. ठाणे जिल्ह्यासह मुंबईची तहान भागवण्यासाठी या नद्यांवर आपण धरणे बांधली. धरणांमुळे आपला पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. पण, दुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू होणारे नवे औद्योगिक प्रकल्प, होणाºया रासायनिक प्रक्रिया, शेतीत होणारे औषधी प्रयोग, सांडपाणी यामुळे गेल्या काही वर्षांत नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊ लागल्या आहेत. पावसाळ्याचे दिवसवगळता वर्षभर या नद्या जणू मृतावस्थेत असतात. या नद्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे मत
ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अविनाश कुबल यांनी व्यक्त केले.
पाणी पिण्यायोग्य राहिले नाही
मागील १५-२० वर्षांतच या नद्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. म्हणजे साधारण १५-२० वर्षांपूर्वी जिल्ह्यातील नदीच्या पाण्याची गुणवत्ता चांगली होती. पाणी पिण्यायोग्य, वापरण्यायोग्य होते. पण, आता ती राहिली नाही. यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर नेमून दिलेल्या जबाबदारीनुसार योग्य ती खबरदारी घेत आहे. मात्र, नागरिकांनीही वेळीच आपली जबाबदारी ओळखून नद्या प्रदूषित होणाºया क्रिया थांबवल्या पाहिजे, असेही कुबल म्हणाले.