जागतिक रंगभूमी दिन : प्राथमिक शिक्षणात नाट्यकलेला प्राधान्य द्या - राम गोपाल बजाज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 07:48 AM2018-03-27T07:48:03+5:302018-03-27T08:25:14+5:30
‘पृथ्वी हा ग्रह वाचवायचा असेल; तर रंगभूमी वाचवा. त्यासाठी मुलांना प्राथमिक शिक्षणात अभिनयकलेला प्राधान्य द्या. तरच, पुढची पिढी अधिक संवेदनशील असेल’, असा संदेश प्रसिद्ध रंगकर्मी आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक राम गोपाल बजाज यांनी दिला असून तो युनेस्कोने जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगभरात प्रसारित केला आहे.
- महेंद्र सुके
ठाणे : ‘पृथ्वी हा ग्रह वाचवायचा असेल; तर रंगभूमी वाचवा. त्यासाठी मुलांना प्राथमिक शिक्षणात अभिनयकलेला प्राधान्य द्या. तरच, पुढची पिढी अधिक संवेदनशील असेल’, असा संदेश प्रसिद्ध रंगकर्मी आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक राम गोपाल बजाज यांनी दिला असून तो युनेस्कोने जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगभरात प्रसारित केला आहे.
१९६२ पासून युनेस्को दरवर्षी इंटरनॅशनल थिए`टर इन्स्टिट्यूटने आमंत्रित केलेल्या एका जगप्रसिद्ध रंगकर्मीचा रंगभूमीविषयक संदेश ‘जागतिक रंगभूमी दिवस आंतरराष्ट्रीय संदेश’ म्हणून प्रसारित करते. १९४८ साली स्थापन झालेल्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटला ७० वर्षे झाल्याचे औचित्य साधून यावर्षी जगभरातील पाच नामवंत नाट्यकर्मींचे संदेश प्रसारित करण्यात आले आहेत. त्यात, भारतातून राम गोपाल बजाज, अरब देशांपैकी लेबनॉनमधील माया झबिब, युरोपमधून यूकेतील सायमन मॅकबर्नी, अमेरिकेतून मेक्सिकोच्या सबिना बर्मन आणि आफ्रिकेच्या आयव्हरी कोस्टच्या वेरे वेरे लायकिंग या पाच जणांचे संदेश प्रसारित झाले आहेत.
मुंबईत अनेक वर्षांपासून जागतिक रंगभूमी दिवसाचे निमित्त साधून अवतरण अकादमी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आायोजन करते. या संस्थेचे प्रमुख, प्रसिद्ध नाटककार आणि नाट्यप्रशिक्षक संभाजी सावंत इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या संदेशाचे मराठी भाषांतर करून, त्याचे वाचन करतात. बजाज यांनी जगाला दिलेल्या संदेशाचा त्यांनी मराठी अनुवाद केला असून २८ मार्चला बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रात्री ८.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात त्याचे वाचन करणार आहेत.
भारतीय नाट्यकर्मी बजाज हे नाट्य दिग्दर्शक, नाट्य-चित्रपट अभिनेते, शिक्षणतज्ज्ञ आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक आहेत. त्यांनी मानवी जीवन, त्याचा विकास, निसर्गाशी असणारे नाते कलेशी जोडून समृद्ध रंगचिंतन मांडले आहे. ‘जिवंत नाट्यकलेला आणि तिच्या तंत्रांना, कृत्रिम ऐहिकता आणि क्रोध, लोभ, अभद्र यापासून मुक्त करून तिचे पुनर्शुद्धीकरण न केल्यास मानवी जीवन टिकणार नाही’, असा धोक्याचा इशाराच जगाला दिला आहे. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात अभिनयकलेच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली आहे.
भारतीय रंगभूमीचा हा दुस-यांदा गौरव
इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट १९६२ पासून दरवर्षी एका रंगकर्मीचा संदेश जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने जाहीर करते. या ५५ वर्षांच्या परंपरेत जगाला संदेश देणारे राम गोपाल बजाज हे दुसरे भारतीय नाट्यकर्र्मी आहेत. २००२ मध्ये प्रसिद्ध नाटककार गिरीश कर्नाड यांचा संदेश प्रसिद्ध करण्यात आला होता, अशी माहिती रंगभूमीचे अभ्यासक संभाजी सावंत यांनी दिली.
आतातरी शिक्षण खात्याचे डोळे उघडणार का?
२०१६ मध्ये मध्ये ठाण्यात झालेल्या ९६ व्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नाट्य संमेलनात ‘शालेय शिक्षणात नाट्यविषयक अभ्यासक्रम हवा’ असा ठराव पारित केला होता. संमेलनाला दोन वर्षे उलटून गेली, तरी पुढे काहीही झाले नाही. आता बजाज यांनी दिलेला जागतिक संदेश तरी शिक्षण खाते गंभीरपणे घेणार आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास...
युनेस्कोने १९४८ साली इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. विविध प्रांतांतील नाट्यपरंपरांची आंतरराष्ट्रीयस्तरावर देवाणघेवाण व्हावी आणि रंगभूमी-कलांच्या माध्यमातून राष्ट्राराष्ट्रांत सौहार्द नांदावे, या हेतूने विविध राष्ट्रांत नाट्यमहोत्सव होऊ लागले. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटच्या अनेक शाखा जगभर कार्यरत झाल्या. इंटरनॅशनल थिएटर कम्युनिटी कार्यरत झाली. आधी हेलसिंकी येथे आणि नंतर १९६१ साली व्हिएन्ना येथे झालेल्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटच्या नवव्या जागतिक सभेत, तेव्हाचे अध्यक्ष आरवी किविमा यांनी फिनलंडच्या इंटरनॅशनल थिएटर कम्युनिटी सेंटरच्या वतीने दरवर्षी जागतिक रंगभूमी दिवस साजरा केला जावा, असा प्रस्ताव मांडला. नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आदी देशांतील सेंटर्सने तो प्रस्ताव उचलून धरला आणि १९६२ मध्ये पॅरीस येथे २७ मार्चला राष्टÑीय नाट्यमहोत्सव झाला. त्या महोत्सवाचा आरंभ दिवस हाच ‘जागतिक रंगभूमी दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे ठरले. या दिवशी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने आमंत्रित केलेल्या एका जगप्रसिद्ध रंगकर्मीचा रंगभूमीविषयक संदेश जागतिक रंगभूमी दिवस ‘आंतरराष्ट्रीय संदेश’ म्हणून युनेस्को प्रसारित करते.
यावर्षी पाच रंगकर्मींचा संदेश
इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटच्या स्थापनेला ७० वर्षे झाल्याचे औचित्य साधून जगभरातील पाच नामवंत नाट्यकर्मींचे संदेश प्रसारित करण्यात आले आहेत. त्यात पॅसिफिक आशियातील भारतातून राम गोपाल बजाज, अरब देशांपैकी लेबनॉनमधील माया झबिब, युरोपमधून यूकेतील सायमन मॅकबर्नी, अमेरिकेतून मेक्सिकोच्या सबिना बर्मन आणि आफ्रिकेच्या आयव्हरी कोस्टच्या वेरे वेरे लायकिंग या पाच जणांचे संदेश प्रसारित झाले आहेत.
भारतीय नाट्यकर्मी राम गोपाल बजाज हे नाट्य दिग्दर्शक, नाट्य-चित्रपट अभिनेते, शिक्षणतज्ज्ञ आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे भूतपूर्व संचालक आहेत.
राम गोपाल बजाज यांचा जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संदेश
‘मानवी उत्क्रांतीच्या सगळ्या कथा माहीत झाल्यानंतर थोडक्यात इतकेच समजते की, सगळ्याच जीवमात्रांची धडपड ही अनंत काळ जिवंत राहण्यासाठीच असते. शक्य झाले तर अमर्त्य होण्यासाठी अवघा काळ आणि अवघा अवकाश व्यापण्याकडे या जीवमात्रांचा कल असतो. याच प्रक्रियेत हे जीवमात्र स्वत:ला छिन्नविछिन्न करतात आणि नष्ट करतात, हे वैश्विक सत्य आहे. तथापि, आपण आज अश्मयुगातील गुहेत राहणाºया मानवापासून आजच्या अंतराळयुगापर्यंत मुक्त झालेल्या मानववंशाच्या टिकून राहण्याबद्दल बोलू या. आता आपण अधिक दयाळू झालो आहोत का? अधिक संवेदनशील झालो आहोत का? अधिक आनंदी झालो आहोत का? ज्या निसर्गाचाच आपण एक भाग आहोत, त्या निसर्गाप्रति आपण अधिक प्रेमळ झालो आहोत का?
आपल्या सुरुवातीपासून असणाºया नृत्य, संगीत, अभिनय-नाटक या जिवंत प्रयोग-जीवी कलांनी आता भाषा बोलणारे साधनही विकसित केले आहे, ज्यात स्वर आहेत आणि व्यंजनेही आहेत. स्वर मूलत: भावना व्यक्त करतो आणि विचार वा माहितीचे आदानप्रदान ‘व्यंजने’ करतात. गणित, भूमिती, शस्त्रास्त्र आणि आता संगणक ही त्याचीच निष्पत्ती! आता आपण पुन्हा भाषेच्या या उत्क्रांतीपासून मागे जाऊ शकत नाही. मात्र, जिवंत नाट्यकलेला आणि तिच्या तंत्रांना, कृत्रिम ऐहिकता आणि क्रोध, लोभ, अभद्र यापासून मुक्त करून तिचे पुनर्शुद्धीकरण न केल्यास मानवी जीवन टिकणार नाही.
मास मीडिया आणि आपल्या विज्ञान-तंत्रज्ञानाने आपल्याला राक्षसासारखे शक्तिमान केले आहे. त्यामुळे नाटक बदलले आहे. त्याचे बदललेले स्वरूप हे संकट नसून त्यातील बदललेला मजकूर, बदललेले विचार-विधान आणि त्यातील बदललेला जिव्हाळा हे मात्र संकटच आहे!
पृथ्वी हा ग्रह वाचवायचा असेल; तर रंगभूमी वाचवा! असे आवाहन आजच्या जगातील माणसाला आपण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांना प्राथमिक शिक्षणात अभिनयकला आणि रंगभूमीच्या सर्व जिवंत प्रयोगजीवी कला प्राधान्याने उपलब्ध व्हायला हव्यात. तसं झालं तर, मला विश्वास आहे, पुढची पिढी स्वत:च्या जगण्यातील आणि निसर्गाप्रति नैतिकतेबाबत अधिक संवेदनशील असेल! वाणीचा उचित वापर हा पृथ्वीमातेला आणि इतर ग्रहांनाही कमी धोकादायक असेल! एकतेच्या या वैश्विक युगात, मानवी जीवनाच्या धारणा आणि पोषणासाठी ‘रंगभूमी’ अधिक महत्त्वाची ठरेल! मात्र, त्यासाठी गरज आहे ती कलाकाराने आणि प्रेक्षकांनी एकमेकांपासून भयमुक्त राहून एकमेकांना सक्षम करण्याची!
या माझ्या विचारांची नागरी-अनागरी सर्व स्तरांवर तळागाळापर्यंत अंमलबजावणी करावी आणि तशी सुलभ सोय करावी, अशी मी रंगभूमीला साद घालतो आणि जगाला आवाहन करतो! पुढच्या पिढ्या शिक्षित करण्यासाठी आपली शरीरे, भाषा आणि अंत:करणातील दया एक होऊ दे!’
‘अवतरण’च्या वतीने २८ मार्चला संदेशवाचन!
नाटककार संभाजी सावंत ‘आंतरराष्ट्रीय संदेशा’चा मराठी अनुवाद करून, ‘अवतरण अकादमी’च्या वतीने आयोजित करण्यात येणाºया राज्यस्तरीय एकपात्री व द्विपात्री अभिनय, एकांकिका लेखन या स्पर्धांचे पारितोषिक वितरणात हा संदेश वाचून दाखवतात. मुंबईत १९९९ पासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही जागतिक रंगभूमी दिवस ‘अवतरण’च्या वतीने २८ मार्चला साजरा करण्यात येणार असून मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रात्री ८.३० वाजता राम गोपाल बजाज यांच्या संदेशाचे जाहीर वाचन करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नटवर्य उपेंद्र दाते भूषवणार आहेत.