"वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अन्...", ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे तीव्र आंदोलन
By सुरेश लोखंडे | Published: July 12, 2024 10:12 PM2024-07-12T22:12:57+5:302024-07-12T22:13:46+5:30
मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना दिले.
ठाणे : मुंबईतील कावेरी नाखवा कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे, वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाखवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शहाला फाशी द्या आदी मागण्यांंसाठी ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना महिला आघाडीतील रणरागिणीनी आज सायंकाळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले.
या महिला आघाडीच्या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने
मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना दिले. या आंदोलनात जिल्हा संघटक रेखा मोहन खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, उप जिल्हा संघटक अॅड. आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, महेश्वरी तरे, मंजिरी ढमाले, ज्योती कोळी, शहर संघटक प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, पुष्पलता भानुशाली, विद्या कदम, राजेश्री सुर्वे, स्नेहा पगारे, उषा बोरुडे, वैशाली मोरे, विभाग समन्वयक नीलिमा शिंदे, उप शहर संघटक अनिता प्रभू, ज्योती दुग्गल, सुप्रिया गावकर तसेच इतर शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते.
वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नाखवा या महिलेला चिरडण्यात आले. आरोपी मिहीर शहा हा शिंदे गटाचे पालघरचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्याने तब्बल ६० तासानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून मंत्र्यांनी पोलिसांनवर राजकीय दबाव टाकून शोधकार्य करण्यास विलंब लावून मोठे षडयंत्र रचले आदी आरोप या आंदोलनकर्त्यां महिलांनी यावेळी केले .
मुंबई पोलीस सराईत गुन्हेगाराला तात्काळ पकडू शकतात तर या मुजोर मिहीर शहाला पकडण्याकरिता तीन दिवस का लागले ? यासाठी कोणत्या राजकीय बड्या नेत्याचा दबाव होता ? हे महाराष्ट्रासमोर आलेच पाहिजे. मतांसाठी आपल्या लाडक्या बहिणीचा वापर करणारे मुख्यमंत्री आता वरळी मधील कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीला न्याय देणार का ? असा सवाल देखील आंदोलनकर्त्या महिला शिवसैनिकांनी यावेळी केला.
शहांच्या अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करा.
- गुन्हेगारीची पुनरावृत्ती होऊ नये व हा खटला फास्ट ट्रॅक वरती चालवून मानवरुपी राक्षस प्रवृत्तीच्या मिहीर शहाला फाशीच झाली पाहिजे. तसेच शहा कुटुंबीयांच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीने आपल्या निवेदनात केली आहे.