महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नसणे चिंताजनक - राज्यपाल
By admin | Published: March 22, 2016 02:16 AM2016-03-22T02:16:18+5:302016-03-22T02:16:18+5:30
महानगरात महिलांसाठी पुरेशा संख्येने प्रसाधनगृहे नसल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चिंता व्यक्त केली. ७० ते ८० लाख लाख लोक मुंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास करतात.
ठाणे : महानगरात महिलांसाठी पुरेशा संख्येने प्रसाधनगृहे नसल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चिंता व्यक्त केली. ७० ते ८० लाख लाख लोक मुंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास करतात. त्यातही ५० टक्के महिला असतात. परंतु, त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पुरेशा संख्येने प्रसाधनगृहे नसल्याने त्यांची कुचंबणा होते. परिणामी, त्यांच्यात मूत्रमार्गाचे रोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे क्लेशकारक असल्याची खंतही त्यांंनी व्यक्त केली.
उत्तन येथे पार पडलेल्या युवा भारत पॉलिसी पार्लमेंटच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. नवी दिल्लीच्या पब्लिक पॉलिसी रिसर्च सेंटर व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे हा कार्यक्रम झाला. त्याचा समारोप राज्यपालांच्या हस्ते झाला.
राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेततळी घेण्याचा तसेच पावसाचे पाणी अडवून साठवण्याचा चांगला
उपक्र म हाती घेतला आहे. परंतु, आपली खेडी सुजलाम्, सुफलाम् झाल्याशिवाय स्वच्छ भारत अभियानाला फारसा अर्थ राहणार नाही. युवकांनी महात्मा गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ या मंत्राचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत राव यांनी मांडले.
जलसंवर्धन आणि पाणी साठवण्याचा उपक्र म स्वच्छ भारत अभियानाशी जोडल्यास हे अभियान अधिक व्यापक होईल. याचप्रमाणे सार्वजनिक, खाजगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन या अभियानास गती देण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
मेक इन महाराष्ट्र, कृषी विद्यापीठांतील संशोधन, राज्याला असलेली नामांकित संशोधन संस्थेची गरज यासारख्या विषयांकडे राज्यपालांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. लवकरच सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांची एक बैठक बोलावण्यात येणार असून त्यात राजकीय नेते, मंत्र्यांनादेखील आमंत्रित करण्यात येऊन विद्यापीठांच्या संशोधनांवर चर्चा करण्यात येईल, असे सांगून राज्यपाल म्हणाले, राज्यात पडणारा दुष्काळ, हवामानाशी संबंधित अनियमितता यावर या कृषी विद्यापीठांनी अधिक संशोधन करण्याची गरज आहे.
शेतक ऱ्यांना अधिक चांगल्या संशोधनांचा लाभ पदरी पडावा, यासाठी कंपन्या आणि आपल्या कृषी संशोधन संस्था यांनी संयुक्तरीत्या एक व्यासपीठ स्थापावे, अशी सूचनाही त्यांनी केली. परभणी येथील कृषी विद्यापीठाने तयार केलेली मळणी, नांगरणी पेरणी ही यंत्रे विशेषत: आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना उदरनिर्वाहासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. या दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.