पुढील जन्म ठाण्यात घ्यायला आवडेल, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 04:10 AM2019-12-07T04:10:10+5:302019-12-07T04:10:24+5:30
ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचे २६ वे पं. मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे : मुंबईत आल्यावर मला ठाणे हे गाव आहे, असेच आधी वाटले होते. पण, येथील श्रोत्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. त्यामुळे मला देवाने पुढील जन्मस्थळ निवडण्याची संधी मिळाली तर, मी ठाण्याचीच निवड करेल, असे ठाण्यातील रसिकांविषयीचे गौरवोद्गार पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शुक्रवारी पंडित राम मराठे संगीत महोत्सवात काढले.
पंडित चौरसिया यांना ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते संगीतभूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. हार्मोनियम वाद्यासाठी फेलोशिपचे पहिले मानकरी ठरलेले ठाण्याचे अनंत जोशी यांना संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती युवा पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले.
ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचे २६ वे पं. मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची सुरुवात प्रसिद्ध बासरीवादक विवेक सोनार यांच्या वादनाने झाली. याप्रसंगी खासदार राजन विचारे, ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर, अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, विद्याधर ठाणेकर, ठामपा सभागृहनेते अशोक वैती, महापालिका उपायुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.
दोन दिग्गजांचा सन्मान
कार्यक्रमात पंडित चौरसिया यांच्या हस्ते ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचाही सन्मान करण्यात आला. उस्ताद राशीद खान हे १० वर्षांनी या महोत्सवात उपस्थित राहिल्याने त्यांचाही चौरसिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिंदेंची अनुपस्थिती;
रसिकांची गर्दी
गतवर्षी पं. मराठे संगीत महोत्सवाकडे ठाणेकर रसिकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे यंदा महापालिकेने काळजी घेतल्याने रसिकांची बऱ्यापैकी गर्दी होती. बºयाच वर्षांनी बाल्कनीत प्रेक्षक पाहण्यास मिळाल्याचे यावेळी महापौर म्हस्के म्हणाले. कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव केला जाणार होता. मात्र, ते अनुपस्थित राहिल्याने महापौरांच्या हस्ते सत्कारमूर्तींना गौरवण्यात आले.
आम्हाला पैसे खर्च
करावे लागतात - म्हस्के
महोत्सवात आलेली कलाकार मंडळी आणि आम्ही राजकारणीही कलाकार मंडळीच आहोत. आम्हीसुद्धा आमची कला सादर करून नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न करत असतो. ही कलाकार मंडळी कला दाखवून रसिकांना खूश करतात. पैसे मोजून प्रेक्षक त्यांना ऐकण्यासाठी येतात. पण, आम्हाला पैसे खर्चून प्रेक्षकांना जमवावे लागते, असे महापौर म्हस्के यावेळी म्हणाले.
पुरस्काराचे स्वरूप
पं. चौरसिया यांना ५० हजार आणि स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ तर जोशी यांना २५ हजार आणि स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.