कविता अशी लिहा, ज्यातून प्रबोधन झाले पाहिजे - जयदेव भटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:45 AM2021-09-21T04:45:23+5:302021-09-21T04:45:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी - कविता लिहिताना अशी कविता जन्माला घाला की, त्या कवितेतून समाज प्रबोधन झाले पाहिजे. महामानवांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी - कविता लिहिताना अशी कविता जन्माला घाला की, त्या कवितेतून समाज प्रबोधन झाले पाहिजे. महामानवांच्या कार्याची महती आपल्या कवितेच्या माध्यमातून उमटणे भविष्यात गरजेचे झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व कवी जयदेव भटू यांनी भिवंडीत व्यक्त केले.
शहरातील काप आळी, आंबेडकर नगर येथील चंद्रमणी बुद्ध विहार येथे रविवारी सायंकाळी वर्षावास कार्यक्रमानिमित्त कवी संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. बौद्धजन पंचायत शाखा क्रं. २८३ यांच्या वतीने संमेलन आयोजिले होते. कार्यक्रमाचे उदघाटन गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आले.
यावेळी जेष्ठ कवी, गायक राजरत्न राजगुरू, कवी विजयकुमार भोईर, कवी नवनाथ रणखांबे, कवी नरेश जाधव, कवी मिलिंद जाधव, कवी दिनेश भोईर, कवी शाम बैसाणे, कवयित्री सुरेखा गायकवाड, कवयित्री मनिषा मेश्राम यांनी विविध विषयांवर कविता सादर करत प्रबोधन केले. यावेळी बौद्धजन पंचायत क्रं. २८३ शाखेच्या अध्यक्षा माया शेलार, माजी अध्यक्ष मिलिंद शेलार, अँड. गुलाब खंदारे उपस्थित होते.