शांता शेळके यांच्या साहित्याचा श्रोता हाच समीक्षक होता - वामनराव देशपांडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 05:30 PM2018-09-29T17:30:47+5:302018-09-29T17:47:27+5:30
शांताबाई शेळके यांच्याकडे असामान्य अशी बुद्धीमत्ता होती तरी देखील त्यांना आपली कला फुलविण्यासाठी कष्ट घ्यावे लागले होते.
डोंबिवली- शांताबाई शेळके यांच्याकडे असामान्य अशी बुद्धीमत्ता होती तरी देखील त्यांना आपली कला फुलविण्यासाठी कष्ट घ्यावे लागले होते. त्यांच्या कवितांमध्ये तत्वज्ञानाचा बेस आहे. म्हणूनच गदिमा, शांता शेळके यांच्या वाटयाला समीक्षा कधी गेली नाही. श्रोता हाच त्यांचा समीक्षक होता, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे डोंबिवली शाखा आणि डोंबिवली ग्रंथसंग्रहालय, डोंबिवली (प.) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाचे पहिले पुष्प कवियत्री शांता शेळके या विषयावर गुंफण्यात आले होते. यावेळी देशपांडे बोलत होते. विनायक सभागृहात शुक्रवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लक्ष्मीनारायण ट्रस्टचे माधव जोशी, मसापचे कार्याध्यक्ष वामनराव देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, शांताबाईच्या कविता या आकाशापर्यंत नेण्यासाठी संगीतकार व गायकांनी मदत केली. त्यामुळे त्या एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचल्या आहेत. विद्या विनयन शोभते असे म्हणतात. त्यांचे एक रूप म्हणजे शांताबाई होत्या. शांताबाई हा विषय एक-दोन तासामध्ये मांडता येण्यासारखा नाही. ही सुरुवात असू शकते. समग्र शांताबाई समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्याकडून विनम्रता शिकून घ्यावी. माणसांनी स्वत: मधील दुर्गणांचा शोध घ्यावा आणि दुसऱ्या व्यक्तीमधील चांगल्या गुणांकडे पाहावे. त्यांचे कौतुक करावे. दुसऱ्या व्यक्तीमधील दोष काढले तर व्यक्ती कोमजून जाते. समीक्षक दोष काढण्याचे काम करतात, असे ही त्यांनी सांगितले.
माधव जोशी म्हणाले, शांता शेळके या चांगल्या कवयित्री होत्या. तशा त्या ललित लेख ही त्याच तोडीचे लिहीत असे. ललित लेखन, कथा, चित्रपटकथा, अनुवाद असे साहित्याचे सर्व प्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्यांना बोलण्याची हौस होती. त्यानंतर त्यांच्या एकेदिवशी मनात आले की आपण मौन बाळगावे. पण मौन धरल्यानंतर भाजीवाले, दूधवाले यांच्याशी संवाद कसा साधणार म्हणून त्यांनी कमी बोलण्याचे ठरविले. या सवयींचा मला पुढे जाऊन फायदा झाला. यामुळे समोरच्या व्यक्तींचे मला निरीक्षण करता येऊ लागले. शांताबाई या गोष्टीवेल्लाळ होत्या. संस्कृत भाषेचा प्रचंड व्यासंग होता. त्यांचा परिणाम म्हणून त्यांना शब्दकळा प्रसन्न होती. शब्दांचा अतोनात सोस असल्यामुळे त्यांच्या भाषेला एक ओघवती अशी प्रसन्नशैली होती. चिंतन आणि वाचन यांच्यामुळे त्यांच्या लिखाणात वाचनीयता आहे. आपल्या लिखाणात त्या सहजरीत्या संदर्भ त्या देत असतात, असे त्यांनी सांगितले.