लेखकांना त्यांचे लेखन सकस बनवण्यासाठी सर्व प्रकारचे अनुभव आवश्यक : मधु मंगेश कर्णिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 04:47 PM2019-10-14T16:47:32+5:302019-10-14T16:50:24+5:30
शहरापासून दूर डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांची जीवनशैली दाखवणारी नृत्यकला पाहायला लोकांनी तुडुंब गर्दी केली होती.
ठाणे : लेखकांना त्यांचे लेखन सकस बनवण्यासाठी सर्व प्रकारचे अनुभव आवश्यक असतात. कोजागरी निमित्त आयोजित केलेली आदिवासींची नृत्ये त्यांच्या जीवन शैलीचे द्योतक असल्यामुळे लेखकांच्या मनावर वेगळा परिणाम करून जातील असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सीकेपी सभागृहातील आयोजित केलेल्या आदिवासी नृत्य समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे आणि सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट व सोशल क्लब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा झालेल्या कोजागरी कार्यक्रमात, मोखाडा येथील राजन वैद्य यांच्या आदिवासी पथकाने आपल्या पस्तीस कलाकार व वादकांसह तब्बल दोन तास रसिकांचे मनोरंजन केले. त्यावेळी सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सतीश नाचणे, सीकेपी सोशलक्लबचे कार्याध्यक्ष अतुल फणसे, कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणेच्या अध्यक्षा मेघना साने उपस्थित होत्या. यावेळी लोकसाहित्य अभ्यासक सदानंद राणे व राजन वैद्य यांचे सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमात मोखाडा येथील आदिवासी कलावंतांनी तारपा नृत्य, गौरींनाच, नंदी नाच, ढोलनाच यासारखे आदिवासी संस्कृतीचे निदर्शक असलेली नृत्ये सादर करून त्यात माणसांचे मनोरे करून, प्राण्यांचे मुखवटे धारण करून वैविध्य आणले. तसेच काठीवरील कोलांट्या व उंचावर स्वार होणे असे कौशल्यही दाखवले. तारपा, संबळ, ढोल यांच्या तालावर रसिकांनी टाळ्या वाजवून साथ दिली. पंकज पडाळे दिग्दर्शित वारली या नृत्याचे ठाणे येथील ज्ञानसाधना या महाविद्यालयातील मुलींनी सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे निवेदन कोमसापच्या लेखकांनी नाट्यमय संवादात आयोजिले होते. तारपा कसा बनवतात, गौरीसणात निसर्गातील पानाफुलांची पूजा कशी करतात, ढोल नाचात पुरुषांची जीवनशैली कशी असते हे संवादातून सांगितले गेले. संहिता लेखन संध्या लगड यांनी केले होते तर कोमसापचे लेखक संगीता कुलकर्णी, अजित महाडकर, प्राजक्ता सावंत, मनमोहन रोगे,प्रसाद भावे मनीषा चव्हाण, पद्मनाभ जोशी, गणेश गावखंडकर, दीपा ठाणेकर तसेच संध्या लगड हे सहभागी झाले . या वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमाला लेखक अशोक चिटणीस, वैभव दळवी, लेखिका माधवी घारपुरे, चित्रकार बोधनकर, कवी विनोद पितळे समाजसेविका नीतल वढावकर आणि कवी बाळ कांदळकर उपस्थित होते.