केतकी चितळेवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले; वकिलांचा आरोप, जामीनावरील सुनावणी लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 09:54 PM2022-05-23T21:54:04+5:302022-05-23T21:54:45+5:30
अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात केतकीने ठाणे सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर येत्या २६ तारखेला सुनावणी होण्याची शक्यता
ठाणे-
अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात केतकीने ठाणे सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर येत्या २६ तारखेला सुनावणी होण्याची शक्यता आहे. ठाणे न्यायालयाने केतकीला कळव्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, मात्र केतकीने ठाणे न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी रोखुन ठेवली आहे, तर नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अक्ट्रोसिटी गुन्ह्यात केतकीला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. केतकीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे चुकीच्या पद्धतीने आणि राजकीय दबावामुळे दाखल करण्यात आले असल्याचे केतकीचे वकिल घनश्याम उपाध्याय यांनी सांगितले आहे. तसेच पोलीस निपक्ष रित्या काम करत नाहीत, सत्तेत असलेल्या लोकांना मदत करत असल्याचा आरोप देखील केतकीच्या वकिलांनी केले आहेत.
उद्या रबाळे पोलिसांची पोलीस कोठडी संपत असुन उद्या केतकीला ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. या गुन्ह्यात तिला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, केतकीने कळवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर न्यायालयाने यापूर्वी दोन वेळा निर्णय राखून ठेवला होता.