‘यशाेमती ठाकूर यांनी संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारावी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:00+5:302021-06-16T04:53:00+5:30
मुरबाड : ठाणे जिल्ह्याचा विस्तार पाहता काँग्रेसने अस्लम शेख यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची संपर्कमंत्री म्हणून दिलेल्या जबाबदारीनुसार काम करणे त्यांना ...
मुरबाड : ठाणे जिल्ह्याचा विस्तार पाहता काँग्रेसने अस्लम शेख यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची संपर्कमंत्री म्हणून दिलेल्या जबाबदारीनुसार काम करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे निम्म्या जिल्ह्याची जबाबदारी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वीकारावी, या मागणीचे निवेदन मुरबाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे ठाकूर यांना दिले.
महिला जिल्हाध्यक्ष संघजा मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष संजय शेलार, महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, तालुका उपाध्यक्ष नेताजी लाटे, शहराध्यक्ष शुभांगी भराडे, तालुका संघटक अमोल चोरघे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित हाेते. जिल्ह्यातील सहा महापालिका, दाेन नगर परिषदा, दाेन नगर पंचायत व पाच पंचायत समित्या असा विस्तार असून, १६ विधानसभा व तीन लोकसभा आहेत. त्यामुळे ठाणे ग्रामीण तसेच कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिका याठिकाणची जबाबदारी ठाकूर यांच्याकडे दिल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना नवसंजीवनी मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. ठाकूर यांना यावेळी चरख्यातून कातलेली धाग्याची माळ आणि राष्ट्रमाता जिजऊ यांची प्रतिमा देऊन त्यांचे शिष्टमंडळातर्फे स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी आपल्यावर ही जबाबदारी दिल्यास संपर्कमंत्री म्हणून काम करेन, असे यावेळी ठाकूर म्हणाल्या.