तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवीचा यात्राेत्सव सलग दुसऱ्या वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:35+5:302021-05-11T04:42:35+5:30
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील वज्रेश्वरीदेवीचा यात्रामहोत्सव कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. मात्र ...
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील वज्रेश्वरीदेवीचा यात्रामहोत्सव कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. मात्र माेजक्याच लाेकांच्या उपस्थितीत प्रथेप्रमाणे सर्व विधी होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
सोमवारपासून देवीच्या उत्सवास प्रारंभ झाला असून, संस्थानचे विश्वस्त धनेश गोसावी यांच्या हस्ते परंपरेप्रमाणे देवीला महाअभिषेक करून दीपपूजा करून सुरुवात झाली. चैत्र आमावस्येला बुधवारी रात्री १२ वाजता देवीचा पालखी सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती संस्थानने दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील आणि विशेषतः ठाणे, रायगड जिल्ह्यातील तमाम आगरी, कुणबी, कोळी, वाडवळ समाजाची कुलदेवता असलेल्या देवीच्या यात्राेत्सवासाठी मुंबई, रायगड, नाशिक आणि शेजारील गुजरात राज्यातून भाविक येतात. यात्रेमध्ये संसारोपयोगी आणि शेतोपयोगी साहित्य विक्रीसाठी येते. कुणबी, आदिवासी, कातकरी आदी समाजाचे लोक वर्षभराचे सामान खरेदी करून ठेवत असतात. यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेली यात्रा होणार नसल्याने भाविकांचा हिरमाेड झाला आहे.
काेट
बुधवारी रात्री देवीच्या पालखी सोहळ्याच्या वेळी कोणीही भाविकांनी आणि परिसरातील ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी करू नये. घरातूनच देवीला हात जोडून लवकरात लवकर कोरोनाच्या संकटातून दूर करण्यासाठी प्रार्थना करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
- सुनील जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक, गणेशपुरी पोलीस ठाणे