यवतमाळची प्रणाली पर्यावरण संवर्धनासाठी सायकलस्वारीद्वारे पालघरमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 12:45 AM2021-04-05T00:45:53+5:302021-04-05T00:46:02+5:30

डहाणूत साडेसात हजार किमीचा टप्पा गाठला

Yavatmal system entered Palghar by cycling for environmental conservation | यवतमाळची प्रणाली पर्यावरण संवर्धनासाठी सायकलस्वारीद्वारे पालघरमध्ये दाखल

यवतमाळची प्रणाली पर्यावरण संवर्धनासाठी सायकलस्वारीद्वारे पालघरमध्ये दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : यवतमाळ जिल्ह्यातील एकवीस वर्षीय प्रणाली चिकटे ही तरुणी सायकलवरून महाराष्ट्र भ्रमंतीला  निघाली असून गावोगावी फिरून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहे. शनिवार, ३ एप्रिल रोजी नाशिकमार्गे तलासरी आणि त्यानंतर ती डहाणूत दाखल झाली.  तिने  साडेसात हजार किमीचा टप्पा पूर्ण केला आहे.  विविध प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्यातील पर्यावरणाचा ऱ्हास  होण्याची भीती असल्याने स्थानिकांनी लढा देण्याचे आवाहन तिने केले.

नाशिकमार्गे शनिवारी तलासरी तालुक्यात प्रणाली दाखल झाली. त्यानंतर, बोर्डी गावात तिचे स्वागत स्थानिक पर्यावरण अभ्यासक सूर्यहास चौधरी, कुंदन राऊत यांनी केले. यावेळी तिने साडेसात हजार किमीचा प्रवास पूर्ण केला असून आतापर्यंत कोणताही अडथळा आला नसल्याचे ती म्हणाली. चिखले समुद्रकिनारी तिने स्थानिकांची भेट घेऊन कार्याची माहिती दिली. येथील समृद्ध पर्यावरणाने प्रभावित झाल्याचे ती म्हणाली. पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्प येऊ घातल्याने, येथील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याआधीच स्थानिकांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन तिने केले. या मोहिमेचा प्रारंभ २० ऑक्टोबर २०२० रोजी तिने यवतमाळ येथून केला. त्यानंतर पश्चिम विदर्भ, नंदुरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील विविध गावांना ती भेट देणार आहे. ठाणे आणि त्यानंतर कोकणात ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करून घरी परतणार असल्याचे प्रणालीने सांगितले.    
    
प्रणाली ही यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्याच्या पुनवट येथील शेतकरी कुटुंबातील आहे. चिकटे कुटुंबीय शेतीवर उदरनिर्वाह करते. मात्र, अपेक्षेपेक्षा उत्पादन कमी मिळते. त्याला पर्यावरणबदल आणि ऱ्हास जबाबदार असल्याचे बीएसडब्ल्यूचे शिक्षण घेतलेल्या प्रणालीला जाणवले. पर्यावरण संरक्षणाची चळवळ राज्यभर पोहोचविण्यासाठी तिने सायकलने भ्रमंती करण्याचे ठरवले.  खेडोपाड्यांसह शहरी भागात सायकलने पोहोचणे शक्य आहे. यासाठी कोणताही खर्च येत नसून थेट लोकांशी संपर्क साधत पर्यावरणाचा संदेश देता येतो. त्या-त्या ठिकाणचे भौगोलिक ज्ञान व पर्यावरणाच्या वैशिष्ट्याचा अभ्यास करता येतो. वायू, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी सायकल वापरा. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर, वृक्षारोपण करून झाडे जगवा, परिसर स्वच्छता इ. उद्देश तिने स्पष्ट केले. 
 

Web Title: Yavatmal system entered Palghar by cycling for environmental conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.