यंदा हापूस आंब्याचे ३५ टक्केच उत्पादन, हवामान बदलाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 01:08 AM2019-04-29T01:08:22+5:302019-04-29T06:17:27+5:30
दुबार थंडी आणि पहिला मोहोर गळून पडल्याने यंदा फक्त ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन येईल, अशी भीती कोकणातील शेतकऱ्यांना आहे. यामुळे आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात आले
ठाणे : दुबार थंडी आणि पहिला मोहोर गळून पडल्याने यंदा फक्त ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन येईल, अशी भीती कोकणातील शेतकऱ्यांना आहे. यामुळे आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात आले, तरी त्याचे दर सर्वसामान्यांना परवडेल, असेच आहेत, अशी माहिती संस्कारचे पदाधिकारी विष्णू रानडे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, बाहेरचे विक्रेते कर्नाटकचा आंबा आणि कोकणातील आंबा मिक्स करून विकत असल्याचा आरोप कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केला.
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव १ ते १० मे या कालावधीत आयोजिला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी उद्घाटन होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. १५ वर्षांपूर्वी आंबाविक्री ही दलालांच्या हाती होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळत नव्हता. शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळ घालून कोकणातील शेतकºयांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले. या महोत्सवातून गवतात पिकलेला आंबा ग्राहकांना मिळणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. महोत्सवात यंदा ५० स्टॉल्स असून त्यातील ४० स्टॉल्स हे आंब्याचे आणि उर्वरित १० स्टॉल्स हे महिला बचत गटांना देण्यात आले आहेत.
या स्टॉल्सवर आंबापोळी ते पन्हे अशी विविध प्रकारांची कोकणातील उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. २०१६ साली एक लाख ८० हजार हेक्टरमध्ये तीन लाख २० हजार मेट्रिक टन उत्पादन येत होते. ते खाली येऊन २०१७ साली दोन लाख ५६ हजार मेट्रिक टन आणि २०१८ साली १ लाख २८ हजार मेट्रिक टन आले. मुंबईत ३६० कोटी रुपयांच्या आंब्याची विक्री होते. त्यातील १०० कोटी रुपयांच्या आंब्याची निर्यात होते, अशी माहिती रानडे यांनी दिली. गेल्या वर्षी या महोत्सवात जवळपास सव्वादोन कोटींची खरेदीविक्री झाली. यंदाच्या महोत्सवात तीन कोटीपर्यंत आंब्याची उलाढाल जाऊ शकते, अशी आशा पत्रकार परिषदेत व्यक्त केली.