पुणे-नगर मार्गावरील दरोड्यातील फरारी आरोपी एक वर्षाने जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 09:36 PM2018-08-01T21:36:11+5:302018-08-01T22:07:03+5:30
वर्षभरापूर्वी पुणे-अहमदनगर महामार्गावर एका सिगारेट कंपनीच्या वाहनातून नऊ दरोडेखोरांनी ३५ लाखांचा माल लुटला होता. त्यापैकी आकाश दिगंबर फड (२६) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली.
ठाणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर वर्षभरापूर्वी एका सिगारेट कंपनीच्या वाहनातून नऊ दरोडेखोरांनी ३५ लाखांचा माल लुटला होता. त्यापैकी आकाश दिगंबर फड (२६) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली. त्याला सुपा (जिल्हा अहमदनगर) पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुण्याच्या रांजणगाव एमआयडीसीतील एका सिगारेट कंपनीचा माल नगरकडे जात असताना २०१७ मध्ये नऊ जणांच्या टोळक्याने या मालवाहू ट्रकमधील सुमारे ३५ लाख सहा हजारांचा माल लुटला होता. याप्रकरणी अहमदनगरच्या सुपा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातील नऊपैकी सात जणांना यापूर्वीच अटक झाली आहे. त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा माल हस्तगत केला होता. अन्य दोन फरार आरोपींपैकी आकाश हा ठाण्याच्या वंदना सिनेमा, एसटी स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांना मिळाली होती. तिच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांच्या पथकातील पोलीस हवालदार दिलीप तडवी, पोलीस नाईक रूपवंत शिंदे आणि कॉन्स्टेबल सागर सुराळकर यांच्या पथकाने आकाशला ३० जुलै रोजी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला या प्रकरणात ३१ जुलै रोजी सुपा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.