गणेशोत्सव मंडळांवर यंदा ‘कडकीचे विघ्न’
By admin | Published: September 3, 2015 11:22 PM2015-09-03T23:22:29+5:302015-09-03T23:22:29+5:30
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता दहीहंडीपाठोपाठ गणेशोत्सवावरही विरजण पडणार आहे. मंडपाच्या कमी होणाऱ्या आकारामुळे देखाव्यांच्याही आकारावर निर्बंध येणार आहेत.
ठाणे : उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता दहीहंडीपाठोपाठ गणेशोत्सवावरही विरजण पडणार आहे. मंडपाच्या कमी होणाऱ्या आकारामुळे देखाव्यांच्याही आकारावर निर्बंध येणार आहेत. तसेच विद्युत रोषणाई आणि इतर सर्वच बाबींवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव कसा साजरा करायचा, असा पेच गणेशोत्सव मंडळांपुढे निर्माण झाला असतांनाच आता त्यांना कोणी वर्गणीही देत नसल्याने त्यांच्यावर कडकीचे विघ्न ओढावले आहे.
उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर ठाणे महापालिकेनेही या मंडपासंदर्भातील पॉलिसी महासभेपुढे सादर करून ती मंजूर करून घेतली आहे. त्यानुसार, आता मंडपांना परवानगी दिली जात आहे. परंतु, यामुळेच या उत्सवावर परिणाम होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण, काही मंडळांना १० बाय १०० फुटांचीच परवानगी मिळाल्याने मंडप उभारायचा कसा, मूर्ती किती उंच आणायची आणि देखावा काय करायचा, असा पेच निर्माण झाला आहे. त्यात उत्सवाच्या नावाखाली गोळा केल्या जाणाऱ्या वर्गणीला खंडणी म्हटले गेल्याने आता मंडळांपुढील तो पेच आणखी वाढला आहे. घरोघरी आणि दुकानदारांकडे वर्गणी मागण्यासाठी जात असलेल्या गणेशोत्सव मंडळांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे वर्गणी मिळाली नाही तर उत्सव कसा होणार? महाभंडारा कसा घालायचा असे विविध प्रश्न आता मंडळांना सतावू लागले आहेत. ठाण्यात २०० हून अधिक मोठी गणेशोत्सव मंडळे आहेत. परंतु, यंदाच्या गणेशोत्सवावरील संकटाचे ढग गडद होऊ लागल्याने आता काही पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून हा उत्सव साजरा करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.