यंदा मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:58 PM2019-12-28T23:58:52+5:302019-12-28T23:59:34+5:30
ठाणे महापालिकेने केला दावा; घरोघरी जाऊन पाण्याच्या नमुन्यांची केली तपासणी
ठाणे : पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येतात. ठाण्यातील आरोग्यसेवेची दरवर्षी महासभेत चिरफाड होत असते. मागील नऊ वर्षांत आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असला, तरी डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत यंदा घट झाल्याचे आढळून आले आहे. महापालिका हद्दीत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या यंदा ११४ होती. हीच संख्या २०१५ मध्ये ४७० एवढी आढळून आली होती, तर मलेरियाच्या रुग्णांची संख्या यंदा ३८२ एवढी आढळून आली आहे.
ठाणेकरांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या साथरोगांचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असतो. फायलेरिया विभागाचे २१० अधिकारी, कर्मचारीवर्ग आणि प्रत्येक आरोग्य केंद्रातील १५० कर्मचाऱ्यांचा स्टाफ पावसाळ्यात विशेष लक्ष ठेवून असतात. एखाद्या ठिकाणी साथरोगांचा फैलाव वाढू लागला, तर त्या भागात जाऊन आरोग्य केंद्रातील कर्मचारी हे प्रत्येकाचे रक्तनमुने तपासणार असून, त्याच ठिकाणी उपचार करणार आहेत. याशिवाय, दीड लाख भित्तीपत्रके तयार करण्यात येऊन ती वाटप करण्यात आली होती. विकासकांच्या कामांच्या ठिकाणीदेखील खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच ज्या विकासकांची नव्याने कामे सुरू आहेत, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
याशिवाय, घरोघरी जाऊन पाण्याचे नमुने तपासणे, जनजागृती करणे, आदी कामे या माध्यमातून केली गेली. तसेच मच्छरांची पैदास वाढू नये म्हणून खाजगी आणि सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी पाइपला नायलॉन जाळ्या बसविण्याचे काम केले होते. याशिवाय, इतर उपाययोजना आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत. त्यामुळेच यंदा साथरोगांची जास्त समस्या ठाण्यात आढळून आली नसल्याचा महापालिकेचा दावा आहे. शहरात यंदाच्या वर्षात डेंग्यूचे ११४ रुग्ण आढळले आहेत. तर, मलेरियाचे ३८२ रुग्ण आढळले आहेत. हत्तीरोगाचे ११ रुग्ण आढळले आहेत.