यंदा अपघातांची संख्या ७३ ने घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:18 PM2019-11-19T23:18:23+5:302019-11-19T23:18:32+5:30
शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ३७ ब्लॅक स्पॉट; पोलीस उपायुक्तांची माहिती
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षापेक्षा या वर्षी अपघातांचे प्रमाण ७३ ने घटले असून त्यामध्ये मयत आणि जखमींचे प्रमाण ही १६७ ने कमी करण्यात वाहतूक शाखेला यश आले आहे. यातील ५० टक्के अपघात हे इतर रस्त्यांवर झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील १०८ ब्लॅक स्पॉटपैकी ३७ ब्लॅक स्पॉट हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात आहेत. या ३७ पैकी १५ स्पॉट हे नॅशनल हायवे नंबर ३ वर असल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मंगळवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर कोपरी ब्रीजवरील चार ही लेनचे काम हे मे २०२० पर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान ८०८ अपघात झाले होते. त्यामध्ये २१५ जणांचा बळी गेला असून ८०७ जण जखमी झाले आहेत. यामध्ये प्राणांतिक २०८, गंभीर ३८७ अपघातात आणि किरकोळ १९३ तसेच कोणीही जखमी न झालेले २० अपघातांचा समावेश आहे.तर, २०१९ च्या जानेवारी-आॅक्टोबरमध्ये एकूण ७३५ अपघात झाले आहेत. तसेच १७८ जणांचा बळी गेला असून ६७७ जण जखमी झाले आहेत. प्राणांतिक अपघातात ३७ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले असून गंभीर अपघातात ८६ तर किरकोळ अपघातात ४४ ने जखमींची संख्या घडल्याचे वाहतूक शाखेने सांगितले. या वर्षात झालेल्या अपघातांमध्ये नॅशनल हायवेवर १७९ अपघात झाले असून त्यामध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर, किरकोळ अपघातात १४८ जण जखमी झाले आहेत. तर राष्टÑीय महामार्गांवर ५८ अपघात झाले आहेत. त्याध्ये १९ जण मयत तर ४८ जखमी झाले आहेत. त्याचबरोबर इतर रस्त्यांवर ४९८ अपघात झाले असून त्यामध्ये ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४८१ जण जखमी झाले आहेत.
मध्यंतरी वाढलेल्या अपघात आणि त्यामध्ये मयत आणि जखमींची संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने १० टक्के अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक जिल्ह्यास दिले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली रस्ता सुरक्षा कमिटी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १०८ ब्लॅक स्पॉटपैकी ३७ स्पॉट हे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत. अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वाहतूक शाखा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना, नियम पाळले तर हे प्रमाण १० टक्क्यांऐवजी निश्चितच ३० ते ४० टक्क्यांनी कमी होईल, असेही उपायुक्त काळे म्हणाले.
कोपरीच्या चार लेनचे काम मे २०२० पर्यंत होईल
येत्या मे २०२० पर्यंत कोपरी ब्रीजवरील जाणाºया आणि येणाºया मार्गावरील प्रत्येकी चार लेनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर जो जुना पूल तो तोडण्यात येईल. तसेच या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला वाहतूक शाखेमार्फत लागणाºया सर्वप्रकारच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. वाहतूककोंडी होऊ नये. यासाठी इंच-इंच जागेचा वापर करत आहोत. बारा बंगल्यातील रस्त्यांवरूनही वाहतूक होत असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.
एक ते सव्वालाख वाहनांची होत आहे नोंदणी : ठाण्यात दरवर्षी १ ते सव्वालाख वाहनांची नव्याने भर पडत असल्याची माहिती आरटीओ विभागाने वाहतूक शाखेला दिली आहे. या वाढत्या नव्या वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. तसेच या वाहनचालकांच्या मी पहिला जाणार या भावनेतूनही वाहतूककोंडीत जास्त भर पडत असल्याची माहिती वाहतूक शाखेने यावेळी दिली.